निगडी (प्रतिनिधी)- लेवाशक्ती सखी मंचाच्यावतीने दरवर्षी पाककला स्पर्धा घेण्यात येतात. दरवर्षी ठराविक थीम महिलांना दिली जाते. यावर्षीची थीम होती मूग आणि तांदळापासून बनविलेले पदार्थ. औंध, बाणेर, कल्याणी नगर, पिंपळे सौदागर, सांगवी, कात्रज या भागातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बहुसंख्येने सहभागी झालेल्या महिलांनी चविष्ट रेसिपी, आकर्षक सजावट करून रेसिपीज सादर केल्या. यामध्ये महाराजा बिर्याणी, भाताचे पॅटिस, पोंगल, मूगडाळ, पालक सूप, मुगाचे पौष्टीक लाडू, तांदूळ व मूगाच्या पुर्या, राईस क्रिस्पी, तांदळाचे उकडीचे मोदक, वडे, तांदूळ मुगाचे स्प्रिंगरोल, पुलाव, आप्पे, पायसम, तांदळाच्या चकल्या, लेमन राईस, मुगडाळ कचोरी, अनारसे, स्विट पोंगल, ढोकळा, राईस चॉकलेट, कस्टर्ड असे अनेक उत्तमोत्तम प्रकार महिलांनी बनविले होते.
कौतुक करावे तितके कमी
लेवाशक्ती सखी मंचाच्या पाककलेच्या स्पर्धेमध्ये डॉ. मंजूषा कदम, तृप्ती पराग पाटील यांनी परिक्षक म्हणून काम पाहीले. डॉ. मंजूषा कदम म्हणाल्या की, लेवाशक्ती सखी मंचातर्फे घेण्यात आलेला हा अतिशय स्तुत्य उपक्रम होता. महिलांमधील पाककलेचे सुप्त कौशल्यांना वाव देणारा हा उपक्रम आहे. सर्व महिलांनी सादर केलेले सर्व पदार्थ तांदूळ व मुग या पौष्टीक धान्यापासून बनविले होते. एकाच थीमवर गोड आणि तिखट पदार्थ बनवून महिलांनी त्यांचे कौशल्य दाखविले आहे. लेवाशक्ती भगिनी शिल्पा फिरंगे, अनिता तळेले, तेजल परतने, योगिनी बर्हाटे, कांचन तळेले, छाया चौधरी, किर्ती बोरोले, कविता जंगळे, कांचन चौधरी यांनी पाककलेच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.
माझे सहकार्य असेल
तज्ज्ञ परिक्षकांनी पदार्थाची पाचकता, पौष्टिकता, सादरीकरण, उत्तम चव अशा विविध कसोटीनुसार परिक्षण केले. तृप्ती पाटील म्हणाल्या की, स्त्रियांच्या उभारणीसाठी अशा विविध प्रकारच्या उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. महिलांचा वाढता प्रतिसाद पाहून आणखर नाविन्यपूर्ण कार्यक्रम एकत्र येऊन राबविले जावेत. यासाठी माझे सहकार्य करण्यासाठी मी तयार आहे. स्त्री खर्या अर्थाने अन्नपूर्णा होण्यासाठी अशा उपक्रमांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देते. कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल आयोजकांची मी आभारी आहे.
ध्येय सुंदर असेल तर…
पाककला स्पर्धेबद्दल बोलताना रेखा गोळे म्हणाल्या की, रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो. पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे पाहू नका. त्या रस्त्यावर चालत रहा. असेच आपण सगळ्या लेवा भगिनी एकत्र येऊन दृढ संकल्पाने पूर्ण महाराष्ट्रात आपल्या लेवा भगिनींना एकत्र आणू. एका विशाल समुदायाप्रमाणे एकत्र येऊ. आपल्या समाजाच्या संस्काराला बांधून तू तुझा कर्तृत्वाचा ठसा प्रभावीपणे उमटवावेस, असेच वाटते. या पाककला स्पर्धेचे आयोजन रेखा गोळे, गौरी सरोदे, विभावरी इंगळे, किरण पाचपांडे यांनी केले होते.
खाद्य संस्कृतीचे जतन
पाककला स्पर्धेमुळे खान्देशी पाकसंस्कृती पुढील पिढीस मिळणार आहे. आपल्या खाद्य संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हायला हवे. तसेच शहरात आपल्या समाजाच्या महिलांना एक मंच प्राप्त व्हावा, यासाठी लेवाशक्ती सखी मंच पाककला स्पर्धेचे आयोजन करीत असते. या आयोजनामध्ये महिलांनी मोठ प्रतिसाद दिला. चिंचवडेनगर, विठाई कॉलनी याठिकाणी या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होेते. सुंदर रांगोळी काढून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत महिलांनी केले.
महिलांनी कौशल्य दाखवायची संधी
दहावीत असणार्या यशश्री चौधरी हिने ही स्वतः पदार्थ बनविला होता. ती म्हणाली की, मी दहावीला असूनही सहभाग घेतला आहे. पदार्थ बनवायला मला आवडते. महिलांना कौशल्य दाखवाला मिळावे, हाच लेवा शक्ती सखी मंचाच्या खरा उद्देश आहे. पुढील पिढीला खाद्यसंस्कृती समजते. पौष्टीक पदार्थ बनविणे हे गृहिणी म्हणून सर्वात आधी कर्तव्य असते. एका स्त्रीची जबाबदारी उत्तम, चविष्ट आणि पौष्टीक पदार्थ बनविणे हे असते. फक्त मूग आणि तांदुळापासून कितीतरी प्रकार बनविता येऊ शकतात हे या स्पर्धेतून समजले.
या पाककला स्पर्धेमध्ये भावना बोंडे, प्रेरणा बोरोले, माधुरी भंगाळे, सिंधू भारंबे, विद्या महाजन, वैशाली चौधरी, लिना पाटील, मिनाक्षी गाजरे, निता महाजन, यशश्री बोरोले, सायली चौधरी, कविता चौधरी आदी महिलांनी सहभाग घेतला होता. या महिलांनी मुग डाळीचे दहिवडे, तांदूळ, मुगडाळीचे आप्पे, कचोरी, मुग पापडी चाट, खांडवी, पौष्टीक मुग टिक्की, बीट पुलाव, हरभरे वडे, मुगडाळ डोसा असे अनेक चविष्ट पदार्थ बनविले होते. या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती व आयोजनकर्ते रेखा गोळे, गौरी सरोदे, विभावरी इंगळे, चारूलता चौधरी, शितल नारखेडे विजया जंगले, किरण पाचपांडे यांची उपस्थिती होती.
लेवा भगिनींचे आभार
चिंचवडे नगर विभागामध्ये अंजली सुनील पाटील या परिक्षक म्हणून लाभल्या होत्या. त्या म्हणाल्या की, कार्यक्रमाबद्दल काय सांगावे तेच कळत नाही. पण कार्यक्रम खूप छान झाला. सर्वच महिलांनी उत्तम पदार्थ बनविले होते. त्यांची चव, सजावट सर्वच छान होते. दुसर्या परिक्षक होत्या पल्लवी इंगळे म्हणाल्या की, कार्यक्रम खुपच छान होता. अगदी लहान मुलांपासून ते आजीपर्यंत सर्वांनी यात सहभाग घेतला होता. पदार्थ पौष्टीक व चविष्ट होते. खूप सुंदर कल्पना लेवा शक्ती सखी मंचाने राबविली आहे. त्याबद्दल सर्व भगिनींचे आभार.