मुंबई: लेवा समाजाच्या नेत्यांचे भाजपकडून खच्चीकरण होत असल्याच्या विरोधात पाटीदार क्रांती दलाने एल्गार पुकारला आहे. भाजपा सरकारच्या भूमिकेविरोधात क्रांती दलाच्या वतीने आझाद मैदानात आंदोलन पुकारले आहे. राज्यातील लेवा-पाटीदार समाज आजपर्यंत भाजपाच्या बाजूने उभा राहीला. परंतु सद्या भाजपा सरकार हे लेवा-पाटीदार समाजाच्या विरोधात काम करत आहे, यामुळे वेळीच सरकारने समाजाच्या विरोधातील भूमिका बदलली नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत गुजरातसारखी अवस्था करू असा इशारा लेवा पाटीदार समाजाच्या पाटीदार क्रांती दलाने दिला आहे.
मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले लेवा-पाटीदार समाजाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर केवळ आरोप झाले म्हणून मंत्रिमंडळातुन बाहेर काढले. परंतु अनेक मंत्र्यावर आरोप सिद्ध होऊनही प्रकाश मेहता, सुभाष देसाई यांना मात्र मंत्रिमंडळात अजूनही ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे लेवा-पाटीदार समाजाचे प्रतिनिधी असलेले भाजपाचे हरिभाऊ जावळे, सुरेश भोळे यांना मंत्रिमंडळात अथवा कोणत्याही महामंडळावर स्थान देण्यात आले नाही. यामुळे समाजात भाजपाविरोधात मोठी नाराजी असून त्याची किंमत भाजपला येत्या निवडणुकीत मोजावी लागेल असा इशारा पाटीदार क्रांती दलाचे प्रमुख सुहास बोंडे यांनी आज दिला. बोंडे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आझाद मैदानात सरकारविरोधात आंदोलन सुरू केले आहे. लेवा- पाटीदार समाजाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरील आरोप चुकीचे असून त्यांना तात्काळ मंत्रिमंडळात घ्यावे व इतर एका प्रातिनिधीलाही स्थान द्यावे अशी मागणीही यावेळी बोंडे यांनी केली.