लॉकडाऊनचा फटका… एरंडोल बस आगाराचे तीन कोटीचे नुकसान

0

एरंडोल:- येथील बस आगारला एप्रिल २०१९ मध्ये दोन ते अडीच कोटीचे उत्पन्न मिळाले होते. एप्रिल हा महिना प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने वर्षातील सीझनचा महिना असल्यामुळे यावर्षी कोरोनामुळे एप्रिलमध्ये बस आगाराला येणार्‍या उत्पन्नात मोठा फटका बसला आहे. जवळपास अडीच ते तीन कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात संचारबंदी सुरू लागू करण्यात आली आहे. दि. २३ मार्च पासून एरंडोल आगारातील सर्व ६० बस गाड्याची चाके आगारातच थांबले आहे. प्रति दिवस सुमारे पाच ते सहा लाख रुपयाचे उत्पन्न बुडत आहे. या वृत्ताला आगार प्रमुख व्ही. एन. पाटील यांनी दुजोरा दिला आहे. एरंडोल बस आगार हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ औरंगाबाद शिरपूर राज्य महामार्ग व एरंडोल नांदगाव येवला राज्य महामार्ग अशा तीन प्रमुख मार्गांवर मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे एरंडोल येथून रोज प्रवाशांची मोठ्या संख्येने ये-जा सुरू असते.एरंडोल बस आगारात कर्मचार्‍यांची संख्या ३२० आहे.

लॉकडाऊन वाढल्यामुळे अधिक परिणाम

लॉक डाऊनचा कालावधी लांबल्यामुळे अजून या आगाराला मोठा फटका बसला आहे. प्रवासी वाहतुकीच्या संदर्भात व उत्पन्न वाढीबाबत एरंडोल बस आगाराला याआधी राज्यस्तरीय बक्षीस मिळाले आहे. मात्र यावेळी लॉकडाऊनमुळे या बस आगाराचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. बस आगार कार्यान्वित झाल्यापासून प्रथमत:च बस गाड्यांची चाके थांबली आहेत. दि. २३ मार्चपासून बस आगाराचे कामकाज ठप्प झाले आहे.