लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यावर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई

0

शहादा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने उपाययोजना आखल्या आहेत.  नियम मोडून विनाकारण शहरात मोटरसायकलवर फिरणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस विभाग नजर ठेवून असून विनाकारण डबल शिट तसेच मास्क न लावणाऱ्यांना कारवाईस सामोरे जावे लागत आहे .दोन दिवसापासून पोलिसांनी अनेकांवर दंडात्मक कारवाई केली तर काहींना चांगलीच अद्दल घडवली.

कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन आहे. जिल्हा ऑरेंजझोन मध्ये असला तरी ज्या भागात जास्त रुग्ण सापडले आहे त्या भागात सर्वांना निर्बंध लावण्यात आले आहे.शहादाशहरात कोरोणाचे नऊ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. त्याअनुषंगाने प्रभाग सात प्रभाग चार व प्रभाग दोन हे सर्व परिसर कंटेनमेंट झोन असून या परिसरात सर्वांना येण्यास बंदी घातली आहे. तद्नंतर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये काही ठिकाणी अटी शर्तींवर नियम शिथिल करण्यात आले परंतु नागरिकांनी बाजारात एकच गर्दी सुरू केली.सर्व काही अलबेल असल्याचे जाणवत होते.शहरात मोटर सायकलिंचा धुराळा उडायला लागला होता.सांगूनही न ऐकणाऱ्या नागरिकांसाठी अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला शहरात विनाकारण मोटर सायकलींवर फिरणारे तसेच डबलसीट , मास्क न लावलेले नागरिक व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांवर पोलिसांनी खाक्या दाखवल्या. स्टेट बँक परिसर ,बस स्थानक ,जुने तहसील कार्यालय या भागात पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी स्वतः थांबून कर्मचाऱ्यांना मार्फत कारवाई केली.
प्रशासनाच्या खंबीर धोरणामुळे स्थिती नियंत्रणात पण…..
शहरात कोरोना विषाणूंची लागण झालेले नऊ रुग्ण सापडल्यानंतर पुढील संक्रमित साखळी तोडण्यात प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे यश आले यावेळी नागरिकांनी हि मोठ्या प्रमाणावर प्रशासनाला साथ दिली होती परंतु सध्या रूग्ण संख्येत वाढ नसली तरी प्रशासन आपली खबरदारी कायम घेत आहे .परंतु नागरिकांची साथ मिळणे क्रमप्राप्त आहे.प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी सकाळी आठ ते बारा वाजे दरम्यान दुकाने उघडण्यास मुभा दिली आहे. तेही फिजिकल डिस्टनसिंगचा नियम पाळत नागरिकांना खरेदी व विक्री करता येणार आहे .तसेच मुख्य बाजार परिसरात येताना नागरिकांनी दुचाकी आणू नये असे पोलिस प्रशासनातर्फे अनेकदा बजावून सुद्धा नागरिक विनाकारण दुचाकी आणून नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे.