लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीसाठी राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी

0

मुंबई– राज्यात लॉकडाऊनचा कालावधी १७ मे २०२० पर्यंत वाढवल्यानंतर या काळात करावयाच्या उपायांच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांसंदर्भात आज राज्य शासनामार्फत आदेश जारी करण्यात आला.

१) रेड झोनमध्ये समाविष्ट एखाद्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यातील महापालिका क्षेत्राबाहेरील भागात मागील २१ दिवसात एकही रुग्ण आढळलेला नसल्यास तो भाग ऑरेंज झोन समजण्यात येईल. ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट एखाद्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यातील महापालिका क्षेत्राबाहेरील भागात मागील २१ दिवसात एकही रुग्ण आढळलेला नसल्यास तो भाग ग्रीन झोन समजण्यात येईल. महापालिका क्षेत्राबाहेर मागील २१ दिवसात १ किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळले असल्यास हा भाग जिल्ह्यांच्या वर्गवारीनुसार रेड किंवा ऑरेंज झोन समजण्यात येईल.

२) कंटेन्मेंट झोनची हद्द निश्चित करताना जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्गित आणि संपर्कातील व्यक्तींचे मॅपिंग करणे, कोरोना संसर्गित आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या हालचालीचे भौगोलिक क्षेत्र. योग्यरीत्या सीमांकन योग्य परिघ क्षेत्र आणि अंमलबजावणी योग्यता करणे आवश्यक राहील. कंटेन्मेंट झोनची बाह्यसीमा ही नागरी भागामध्ये निवासी वसाहत, मोहल्ला, महानगरपालिकेचा प्रभाग, पोलीस ठाणे हद्द, शहर, आदीप्रमाणे राहील तर; ग्रामीण भागामध्ये गाव, गावांचा समूह, ग्रामपंचायत, पोलीस ठाण्यांचा समूह, गट आदीनुसार राहील. मुंबई आणि पुणे सारख्या लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या शहरामध्ये कंटेन्मेंट झोन निश्चित करताना प्रशासकीय यंत्रणेची लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आणि नियंत्रणयोग्यता या बाबी लक्षात घ्याव्यात.

३) रेड आणि ऑरेंज झोनमध्ये जास्तीत जास्त दक्षता घेणे गरजेचे असल्याने या कंटेन्मेंट झोन हद्दीत कठोर नियंत्रण राखणे आवश्यक राहील. वैद्यकीय आणीबाणी तसेच जीवनावश्यक वस्तू व सेवा याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणाने कोणाही व्यक्तीची/लोकसंख्येची या कंटेन्मेंट झोनबाहेर किंवा बाहेरून आत हालचाल/प्रवास होता कामा नये.

४) सर्व क्षेत्रात (रेड, ऑरेंज, ग्रीन) ६५ वर्षावरील नागरिकांना आजारी व्यक्तींना, गर्भवती महिला, १० वर्षाच्या आतील मुले यांना सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून फिरण्यावर बंदी, वैद्यकीय कारणास्तव डॉक्टरांकडे जाण्याची मुभा मात्र ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, अशा क्षेत्रात बाह्य रुग्ण विभाग आणि दवाखाने सुरु ठेवण्यास मुभा नाही. तथापि, रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून परवानगी देता येईल.

५) ग्रीन झोनमध्ये सर्व व्यवहार सुरू राहतील. मात्र ज्या गोष्टींमुळे गर्दी होईल असे सिनेमागृह,शॉपिंग मॉल्स, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था,रेल्वे सेवा, सामाजिक, राजकीय, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम सुरू ठेवता येणार नाहीत. प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के व्यक्तींना घेऊन बस सेवा सुरू ठेवण्यास परवानगी असेल. बस डेपोमधील कर्मचार्‍यांची उपस्थिती ही पन्नास टक्क्यांपर्यंत मर्यादित इतकीच असावी. बस सेवेला फक्त ग्रीनझोनच्या आतच फिरण्यास परवानगी असेल. अधिकृत पास असल्याशिवाय ग्रीन झोनमध्ये प्रवास करण्यास मनाई असेल.

६) ग्रामीण भागातील सर्व औद्योगिक उपक्रमांना परवानगी राहील. शहरी भागातील बांधकामे : केवळ परिस्थितीजन्य बांधकामे आणि नविनीकरण उर्जा प्रकल्पांच्या बांधकामांना परवानगी आहे. ग्रामीण भागात सर्व बांधकामांना परवानगी राहील.