जळगाव : जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे एका शेतात लॉकडाऊनच्या काळात ओल्या पार्टीत सहभागी भाजपचा नगरसेवक, पोलीस कर्मचार्यासह इतरांचे छायाचित्र व्हायरल झाले होते. पोलीसच सहभागी असल्याचे समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. या मद्याच्या पार्टी प्रकरणी चौकशीअंती 20 दिवसानंतर पार्टीत सहभागी भाजपचा नगरसेवक कुलभुषण पाटील, मुख्यालयातील पोलीस कर्मचारी विनोद संतोष चौधरी, शेतमालक यांच्यासह 9 जणांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस निरिक्षकाने केला चौकशी अहवाल सादर
मोहाडी येथे 21 एप्रिल रोजी दत्तात्रय दिनकर पाटील यांच्या शेतात मद्य पार्टी झाली होती. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांना दिले होते. त्यांनी चौकशी करुन गेल्या आठवड्यात पोलीस अधीक्षकांकडे अहवाल सादर केला होता. त्यानंतर सोमवारी या सर्व 9 जणांविरुध्द जिल्हाधिकार्यांच्या जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन, तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिग न पाळणे आदी प्रकारे कलम 269, 188 तसेच साथीचे रोग नियंत्रण अधिनियम 1897 चे कलम 3,आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 कलम, 51 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगसेवकासह यांच्याविरोधात गुन्हा दाखल
भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील (32,रा.मयुर कॉलनी, पिंप्राळा), मुख्यालयाचे पोलीस कर्मचारी विनोद संतोष चौधरी, सुपडू मकडू सोनवणे (रा.46, बांभोरी, ता.धरणगाव), बाळू नामदेव चाटे (45, रा.मेहरुण), विठ्ठल भागवत पाटील (33, रा.आयोध्या नगर), शुभम कैलास सोनवणे (24, रा.मयुर कॉलनी, पिंप्राळा), अबुलैस आफताब मिर्झा (32, रा.कासमवाडी), हर्षल जयदेव मावळे (31, रा.आयोध्या नगर),दत्तात्रय दिनकर पाटील (32, रा.मोहाडी, ता.जळगाव) यांच्याविरुध्द जामनेर पोलीस ठाण्याचे हवालदार अरविंद भोजू मोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे.