लॉकडाऊन नसेल, पण निर्बंध 15 जून पर्यंत कायम
घराबाहेर निघायचे असल्यास मास्क लावणे विसरू नका ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाला रोखण्यात अजूनही यश आलेले नाही. त्यामुळे यापुढे लॉकडाऊन नसला, तरी निर्बंध कायम ठेवले जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते रविवारी, राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधताना बोलत होते.
राज्यातील जनतेशी संवाद साधतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, तिसरी लाट कधी येणार ते माहित नाही पण आपण खबरदारी घेतली नाही तर ही लाट येणार हे नक्की आहे. कोरोनाचे नवे स्ट्रेन अधिक घातक आहेत. राज्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढत आहे. बुरशीच्या या नव्या आजारावर राज्याचा टास्कफोर्स काम करत आहे. स्टेरॉईडमुळे म्युकरमायकोसिसचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त औषधांचा डोस दिला जाणार नाही याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. राज्यात ‘माझा डॉक्टर’ मोहीम राबविणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यादृष्टीने आपण तयारी केली आहे. लहान मुलांमधील कोविडसंदर्भात बाल रोगतज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला असून, महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य आहे की, ज्यांनी तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स स्थापन केला आहे, असा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला. जूनपासून कोविड प्रतिबंधक लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, अशी दिलासादायी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दहावीच्या परीक्षेच्या निकालाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे १२ वीचे काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. याचा निर्णय लवकरच राज्य सरकार घेईल. १२ वीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची असते. त्यासाठी देशभर या परीक्षेचे एकच धोरण असावे यासाठी मी स्वतः पंतप्रधानांशी बोलणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यापुढे माझा जिल्हा-माझी जबाबदारी, माझे गाव-माझी जबाबदारी आणि माझे कुटुंब-माझी जबाबदारी अशा टप्प्याटप्प्याने आपण कोरोनाला हद्दपार केले तर महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल, असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. घराबाहेर निघायचे असल्यास मास्क लावायला विसरू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
|
|
|
हे देखील वाचा