लॉ चा विद्यार्थी शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो

0

अ‍ॅड. सुभाष पवार : हुतात्मा शिक्षण प्रसारक मंडळाचा बक्षीस समारंभ

राजगुरुनगर । लॉ चा विद्यार्थी हा शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो कारण प्रत्येक गुन्हा हा नाविन्यपूर्ण असतो. माजी आमदार दिलीप मोहिते यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विधी महाविद्यालय स्थापन केले आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करून संस्थेचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष पवार यांनी केले. राजगुरुनगर येथे हुतात्मा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक माजी आमदार दिलीपराव मोहिते पाटील होते. संस्थेचे उपाध्यक्ष बबन डांगले, सचिव डॉ. शिवाजी मोहिते, खजिनदार सुरेखा मोहिते, संचालक अ‍ॅड. सुभाष मोहिते, अरुण चांभारे, शांताराम देशमुख, शिवाजी वाळुंज, प्राचार्य अ‍ॅड. किरण शिंदे आदींसह अनेक मान्यवर याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित होते.

कठीण श्रमाने मिळते यश
वकिलीची सनद मिळाल्यानंतर सुरवातीची उमेदीची 3-4 वर्षे खचून जाऊ नये. प्रामाणिक प्रयत्न व कठीण श्रमाने यश प्राप्त होईल. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी चांगली पूर्वतयारी करावी, असे अ‍ॅड. पवार यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगतात मोहिते यांनी निष्णात वकील होण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्याचा कानमंत्र दिला. पूर्वी गावगाड्यात पंचकमिटीच्या आदेशानंतर तंटे मिटत असत मात्र सध्या तशी परिस्थिती राहिली नसल्याने वकीली क्षेत्राला चांगले महत्व आले आहे. पालकांच्या कष्टाची जाण ठेऊन विदयार्थ्यांनी सरस्वतीची सेवा केल्यास लक्ष्मीदेखील प्रसन्न होईल, असे प्रतिपादन मोहिते यांनी केले.

अहवाल वाचन
रत्नाई महिला महाविद्यालय आणि कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय यांचे अहवाल वाचन प्रा. भागवत यांनी तर विधी महाविद्यालयाचे अहवाल वाचन प्रा. गरुड यांनी केले. प्रियांका जाधव व विद्यापीठ प्रतिनिधी क्रांती कराळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अजय टाकळकर यांना स्टुडंट ऑफ दि इयर यासह 4 पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अ‍ॅड. किरण शिंदे, सूत्रसंचालन प्रा. हेमा गोगावले तर प्रा. निर्मला अडावळे यांनी आभार मानले.