लोंढे वरखेडे प्रकल्प 2019 पर्यंत होणार!

0

चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी लोंढे वरखेडे प्रकल्प बळीराजा योजनेतून 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून गिरणा नदीवरील बलून बंधाराची कामे दोन वर्षात पूर्ण करणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. चाळीसगाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरीकांना व शेतकर्‍यांना विविध योजना, शेतीविषयक संपूर्ण माहिती, लोककल्याणकारी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी महसूल विभाग व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आणि आमदार उन्मेश पाटील यांच्या संकल्पनेतून देवकर मळा, लक्ष्मी नगर, चाळीसगाव येथे शासकीय योजनांची जत्रा, कृषी महोत्सव, राज्यस्तरीय विज्ञान प्रदशर्नाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन होते.यावेळी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती यावेळी व्यासपीठावर
खासदार ए. टी. नाना पाटील, आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील, जि. प. शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे, पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव,उपविभागीय अधिकारी चाळीसगाव शरद पवार, उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा, नारायण देशमुख, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, तहसिलदार, चाळीसगाव कैलास देवरे, चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील, चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याध्याधिकारी अनिकेत मानोरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष के. बी.साळुंखे, नगराध्यक्षा आशाताई चव्हाण आदी उपस्थित होते.

दोन महिन्यात प्रस्ताव द्या! जलसंपदा मंत्री श्री.महाजन पुढे म्हणाले की,लोंढे वरखेडी बॅरेजमुळे तालुक्याचा पिण्याचा प्रश्‍न सुटणार असून सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.जलयुक्त शिवार मधून दरवर्षी 5 हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात आली आहेत. 16 हजार गावे टँकरमुक्त होत आहे.जलयुक्त शिवारसाठी यावर्षी 1500 कोटीची तरतुद करण्यात आली आहे.आरोग्याची समस्या दूर करण्यासाठी भुयारी गटार योजना राबविण्यात येत आहे.या योजनेसाठी 160 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून यासाठी दोन महिन्यात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. शासकीय योजनांची जत्रा हा राज्यातला आगळा वेगळा कार्यक्रम आहे. या माध्यमातून शासनाच्या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे.जिल्हयातील सर्व तालुक्यात असे कार्यक्रम झाल्यास कोणीही योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही. लोकांना योजनांची माहिती मिळून त्यांना लाभ मिळावा, तसेच यासाठी लागणारे सर्व दाखले त्वरीत मिळावे यासाठी आमदार उन्मेश पाटील यांनी सुरु केलेला शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम स्तुत्य आहे.असेही त्यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस- राष्ट्रवादीवर हल्ला शासकीय योजनांची जत्रा, कृषी महोत्सव, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन उद्घाटन कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात विधानभवनाच्या प्रांगणात शेतमाल विक्रीचा बाजार भरवला गेला तर 15 वर्षात काँग्रेस – राष्ट्रवादीने शेतक-यांना लुटण्याचे एकमेव काम केले. त्यांचे हात शेतक-यांच्या रक्ताने माखले असल्याचा हल्लाबोल कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. आपल्या 50 मिनिटांच्या भाषणात विरोधकांवर निशाणा साधला.

विविध स्टॉल
यावेळी शासकीय योजनांची जत्राचे उपविभागीय अधिकारी शरद पवार, कृषी महोत्सवाचे उपविभागीय कृषी अधिकारी अनिल भोकरे, राज्यस्तरीय विज्ञान प्रदशनाचे संचालक रविंद्र रमतकर यांनी प्रास्तविक केले. कार्यक्रमाच्या स्थळी शासकीय योजनांची जत्रा, कृषी महोत्सव, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे स्टॉल लावण्यात आले आहेत.

योजनांचा लाभ गरीबांना मिळावा
यावेळी आमदार अन्मेश पाटील म्हणाले की, शासनाच्या योजनांचा गरीबातल्या गरीब माणसाला मिळाला पाहिजे. यासाठी शासकीय योजनांची जत्रा, कृषी महोत्सव, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.यात सर्व प्रकारचे दाखले लोकांना एकाचवेळी एकाच ठिकाणी देण्यात येत आहे. यासाठी महसूल विभागाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. महिला, गरोदर स्त्री, लहान बालके, शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, शेतकरी अशा सर्व नागरिकांसाठी 152 योजनांचा लाभ या जत्रेत देण्यात येत आहे. 40 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांची आरोग्य तपासणी, महालॅबतर्फे रक्त तपासणी विनामुल्य करण्यात येणार आहे.