भुसावळ : प्रसिद्ध लोककवी, गीतकार व पार्श्वगायक प्रा. प्रशांत मोरे यांनी ‘आई एक महाकाव्य’ या विषयावर आपल्या व इतरांच्या एक ना अनेक हृदयस्पर्शी कविता आपल्या रांगड्या पहाडी आवाजात लयबद्ध रितीने सादर केल्याने रसिक श्रोत्यांचे मन भारावले. येथील तेली समाज मंगल कार्यालय येथे 6 रोजी प्रज्ञासुर्य प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . विचार मंचावर रेल्वे सुरक्षा बलाचे निवृत्त मंडळ आयुक्त तथा गझलकार रमेश सरकाटे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजेश मानवतकर, सचिव प्रा. जतीन मेढे, सहसचिव डॉ. मधू मानवतकर, आयोजन समिती सदस्य अजय पाटील, सावदा मुख्याधिकारी अमोल बागुल यांची उपस्थिती होती.
5 हजार 700 च्या वर प्रयोग
प्रा. मोरे यांनी कवी सदानंद पाचपोळ यांची हंबरून वासराले चाटती जव्हा गाय, तिच्यामंधी दिसते तव्हा माझी माय कविता आपल्या पहाडी आवाजात सादर केली. आपला प्रयोग मोजणे सोडले असे सांगत आज जवळपास 5 हजार 700 च्या वर प्रयोग झाल्याचे त्यांनी सांगत खान्देशी भाषेसह, अहिराणी, कोकणी, सातारा, सांगली, नाशिक, (घाटावरची), मराठवाडा आदी ठिकाणच्या भाषेतील कविता सादर करीत महाराष्ट्रातील बोली भाषेतील मधुरता व मार्मिकतेचे दर्शन घडविले. मराठवाड्यातील सुरेंद्र नाईक यांची जात्यामध्ये दाणे नाही, तरी माय माझी ओढायची, डोळ्यात पाणी नाही तरी माय रडायची, कविता सादर केली.