लोकप्रतिनिधीच्या उदासिनतेने जळगाव विमानतळ झाले शोभेची वास्तू

0

जळगाव – मोठा गाजावाजा करत सुरु करण्यात आलेली जळगाव विमानतळावरील विमानसेवा ही सात महिन्यात बंद पडली आहे. नव्या विमानकंपनीचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येते कधी टाईम स्लॉट उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात येते. असे जरी असले तरी धावपट्टीत वाढ केल्या शिवाय विमानसेवा नियमित सुरु होणे अशक्य आहे. मात्र याचा पाठपुरावा करण्यास लोकप्रतिधी व अधिकारी कमी पडत असल्याने जळगाव विमानतळ शोभेची वास्तू झाले आहे. जळगाव विमानतळ ही तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जळगावला मिळालेली देणगी आहे हे नाकारून चालणार नाही. 2009 मध्ये जळगाव विमानतळाच्या भूमीपूजन केले गेले तर 2012 मध्ये उद्घाटन केले गेले. पहिल्याटप्प्यात 1750 मीटर लांबीची धावपटटी केली गेली. उदघाटन प्रसंगी सध्या लहान विमाने उतरण्यास ही पुरेशी असून दुस-या टप्प्यात मोठी विमाने उतरण्यासाठी 3500 मीटर लांबीची धावपटटी करण्यात येईल, असे सांगत वाढीव धावपटटी, टर्मिनस इमारत आणि अन्य तत्सम सोयांसाठी 65 कोटी रूपये दुसर्‍या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. या नंतर वाढीव धावपटटीसाठी नशिराबाद येथील शेतकर्‍यांकडून तातडीने त्यांची जमीन संपादन करण्यात आली. काही जमीन ही तांत्रिक कारणाने शिल्ल्क राहीली.

‘टाइमस्लॉट’ बनली मुख्य अडचण
भूमीपूजन प्रसंगी जळगावचे माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी दूरदृष्टी दाखवत विमानतळ तयार करतांना त्यास नाईट लँडिंगची सुविधा असावी अशी व्यवहार्य सूचना आपल्याभाषणात केली होती, जेणे करून मुंबई विमानतळावर रात्री लँडिंगसाठी जागा नसल्याने रात्री विमान जळगावला थांबून सकाळी प्रवासी नेता यावे हा हेतू होता. तत्कालीन विमान वाहतुक मंत्री प्रफल्ल पटेल यांनी याच कार्यक्रमात नाईट लँडिंगला मान्यता दिली. आणि जळगावकांच्या विमानसेवेबाबतच्या अपेक्षा उंचावल्या मात्र तयार झालेल्या विमानतळास नाईट लँडिंगची देखील सुविधा केल्यानंतर त्याची देखभाल न झाल्याने ती बंद पडली. जळगाव विमानतळावरून सेवा सुरू होण्या बाबत विविध कंपन्यांशी बोलणे सुरू असल्याचे, कंपन्या इच्छुक असल्याचे वृत्त मधून मधून प्रसिध्द होत राहीले आणि जळगावकर आशाळभूतपणे या सेवेच्या प्रतीक्षेत राहीले. मधल्या काळात विमानतळ ही शोभेची वास्तू झाली होती. धावपटटी वाढवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाही. मंजूर झालेला निधी आणावा असे लोकप्रतिनिधींना देखील वाटले नाही शासकीय अधिकार्‍यांच्या माहितीवर लोकप्रतिनिधी अवलंबून राहीले. केवळ दहा कोटी आणले असते तरी या विमानतळाची धावपट्टी 3300 मीटर पर्यंत वाढली असती. आज जळगावसेवेसाठी टाइम स्लॉट ही मुख्य अडचण बनली आहे. त्यामुळे उडाण योजने अंतर्गत सुरू झालेली सेवा बंद पडली. अन्य कंपन्यासेवा सुरू करण्या बाबत उत्साहीअसल्या तरी स्लॉट मिळत नाही.

शिर्डी विमानतळाचे उदाहरण समोर ठेवा
शिर्डी विमानतळाची धावपट्टी ही प्रथम 1750 मीटर होती. ती 2500 मीटर होताच तेथे मोठी विमाने उतरू लागली. अनेक ठिकाणी सेवा सूरू झाल्या. हे उदाहरण समोर असतांना जळगाव विमानतळाची धावपटटी वाढवण्यासाठी 3300 मीटर पर्यंतचीजागा उपलब्ध असतांना धावपटटी वाढवण्याचे लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न होत नसल्याचे दिसूनयेते. केंद्राकडून धावपटटी साठी निधी उपलब्ध करून घेण्यात हे प्रतिनिधी कमी पडत असल्याचे जाणवते. आज मुंबई-नागपूर, नागपूर-पुणे मुंबई-इंदोर ही विमानसेवाजळगाववरून जाते. विमानतळाची धावपटटी वाढवली तर जादा टाइमस्लॉट न मागता जळगाववरून जाणार्‍या या सेवांना येथे केवळ थांबे देता येतील आणि त्याचा जळगावकरांना मुंबई, पुणे इंदोर विमानसेवेसाठी लाभघेता येईल. ही बाब विमानतळ अधिकार्‍यांनीच लक्षात आणून दिली होती. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे निधी मागितला गेला नाही. लोकसभेच्या तोंडावर आलेल्या निवडणुका पाहता हा निधी मिळवणे आजकठीण नाही. तो मिळाल्यास धावपटटी वाढवली जावून मोठी विमाने उतरू शकतील. जळगावकरांचे विमानसेवेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकते.