वारजे- कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय कक्षेतील प्रभाग क्रमांक 13मधील नागरिकांच्या सहकार्याने ई कचरा व प्लास्टिक कचरा संकलन करण्यात आले. या कचर्याची शास्त्रीय विल्हेवाट लावली जाईल असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले. वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय, श्री रिसाकलर्स व कमिन्स इंडिया यांच्या वतीने कचरा संकलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्लास्टिकच्या पिशव्या व वस्तू, निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू यांची शास्त्रीयपद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रभागात रविवारी हा कार्यक्रम घेण्यात आला. स्वयंसेवकांनी घरोघरी पत्रक वाटून याबाबत आठवडाभर जनजागृती केली होती. त्यानुसार एसएनडीटी कॉलेज कॅनॉल रोड आरोग्य कोठी, पाळंदे कुरियर गल्ली, कै. थरकुडे दवाखाना, मेजर प्रदीप ताथवडे उद्यान, हॅप्पी कॉलनी आरोग्य कोठी, मिलन कॉर्नर येथून सुमारे 300 किलो प्लास्टिक व 250 किलो ई-कचरा संकलित करण्यात आला. यावेळी विनीत बियाणी, सीमा बियाणी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान, राहुल शेळके, संतोष शेंडगे, खंडु कसबे, कृष्णा धनगर, मंगेश थोरात, बाळासाहेब काकडे व नागरिक उपस्थित होते. यावेळी खर्डेकर यांच्या हस्ते नागरिकांना कचर्याच्या बदल्यात एलईडी ट्युबलाईट व बल्ब भेट देण्यात आले. प्रभागात चार हजार घरात कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती केल्याचे खर्डेकर यांनी सांगितले.