लोकमान्य टिळकांच्या खापर पणतूकडून 41 वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण

0

पुणे : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे खापर पणतू व काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्याविरुद्ध 41 वर्षीय वकील महिलेने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केल्यावरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशीरा गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेमुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पीडित महिला गरोदर राहिल्यानंतर टिळक यांनी तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचेही तक्रारीत नमूद आहे. रोहित टिळक हे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी यापूर्वी 2009 मध्ये कसबा पेठेतून पालकमंत्री गिरीश बापट यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणूक लढविली होती. त्याच त्यांचा दारुण पराभव झाला होता. याप्रकरणातील पीडित महिला ही कोथरूड येथे राहणारी असून, ती उच्च न्यायालयात वकिली करते.

टिळक यांच्यावर गंभीर आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वकिलाचे लग्न झाले असून, त्या काही वर्षापासून पतीपासून विभक्त आहेत. दोन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात टिळक यांच्याशी त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या अनेक ठिकाणी भेटी झाल्या. त्यामुळे दोघांमध्ये ओळख वाढली. टिळक यांनी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार तसेच अनैसर्गिक शरीर संबंध ठेवले तसेच लग्नाविषयी विचारल्यानंतर शिविगाळ व मारहाण केल्याचे पीडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तर, रोहित टिळक यांच्यापासून गरोदर राहिल्यानंतर गर्भपात करण्यास भाग पाडल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

केसरीवाड्याचाही तक्रारीत उल्लेख
ही घटना 10 मार्च 2015 ते 5 जुलै 2017 दरम्यान केसरीवाडा, डेक्कन जिमखाना व पुण्यातील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये घडली आहे. पीडित महिला टिळक यांच्या घरासमोर आंदोलन करणार होत्या. त्याबाबत त्यांनी पोलिसांना पत्रही दिले होते. मात्र, ते आंदोलन काही झाले नाही. त्यानंतर गेल्या आठवड्यात पीडित महिलेने पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र, ऐनवेळी ती रद्द केली. दरम्यान, यापूर्वी त्यांनी विश्रामबाग पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारअर्जावर चौकशी करून विश्रामबाग पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सहाय्यक निरीक्षक व्ही. एन. शिंदे अधिक तपास करत आहेत.