लोकलची स्वयंचलित दारे बंद

0

मुंबई । उपनगरीय रेल्वेगाडयांच्या दारांत उभे राहून प्रवास करण्याच्या प्रकारांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी लोकलना स्वयंचलित दरवाजे बसवण्याची योजना आता बासनात गुंडाळण्यात आली आहे. सध्याच्या लोकलगाडयांना हे दरवाजे बसवण्याच्या दृष्टीने पश्‍चिम रेल्वेने एका लोकलमध्ये हा प्रयोग केला. मात्र, त्यात अनेक व्यवहार्य अडचणी येत असल्याने तूर्तास हा विचारच पश्‍चिम रेल्वेने सोडून दिला आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये डोंबिवलीकर भावेश नकाते या तरुणाचा सीएसएमटीला जाणार्‍या लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी मध्य आणि पश्‍चिम रेल्वेने विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता

यामध्ये गर्दीतला प्रवास सुकर करतानाच लोकल डब्यातील गर्दी आटोक्यात राहावी यासाठी सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी लांब पल्ल्याच्या गाडयांमधून उपनगरीय लोकल प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा दिली होती. त्यासाठी प्रवाशांना तिकीट म्हणून कूपन्सही देण्यात आली, परंतु या योजनेकडे प्रवाशांनी पाठच फिरवली. गर्दीच्या वेळी दरवाजात लटकून असलेले प्रवासी पडत असल्याने अखेर हे अपघात रोखण्यासाठी पश्‍चिम रेल्वेने स्वयंचलित दरवाजा लोकलचा प्रस्ताव तयार केला होता.