लोकल, हायवे, बीआरटीएस असताना मी मेट्रो का वापरू!

0

पिंपरी-चिंचवड : पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने बुधवारी सिव्हिल इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी मेट्रोविषयी आपल्या शंका विचारत असताना, माझ्याकडे स्वत:ची गाडी आहे, त्याशिवाय लोकल, सिटी बस असे पर्याय उपलब्ध आहेत; बीआरटीएस सारखे चांगले रस्ते आहेत मग मी मेट्रो का म्हणून वापरायची, असा थेट सवालही विद्यार्थ्यांनी मेट्रोच्या अधिकार्‍यांना केला. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी हैद्राबाद एल अ‍ॅण्ड टी मेट्रो रेल लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ, तसेच महामेट्रोच्या पुणे प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रामनाथन सुब्रमण्यम उपस्थित होते.

तुम्ही वाहतूक कोंडीत का अडकावे?
या चर्चासत्रात बोलताना डॉ. रामनाथन सुब्रमण्यम म्हणाले की, आम्ही मेट्रोच्या माध्यमातून तुम्हाला एका छोट्या विमानतळाच्या सर्व सोयी सुविधा देणार आहोत. जिथे मोफत वायफाय असेल, अती वेगवान व एसीमधला प्रवास असेल, जिथे सुरक्षा विचारात घेतली जाणार आहे, असे असताना तुम्ही तुमची गाडी घेऊन वाहतूक कोंडीत का अडकाल, असे सुब्रमण्यम यांनी सांगितले.

पुणे मेट्रोचा खर्च 11 हजार 420 कोटी
यावेळी विद्यार्थ्यांनी हैद्राबाद मेट्रो प्रकल्प आपल्या प्रकल्पापेक्षा अधिक मोठा असतानाही पुणे मेट्रो प्रकल्पावर खर्च जास्त का? अशी विचारणा केली. त्यावेळी बोलताना विवेक गाडगीळ म्हणाले की, सध्याचा सर्वात जास्त खर्च हा भूसंपादनावर आहे. तसेच हैद्राबादची मेट्रो 2009 मधील आहे. तर पुण्यातील मेट्रो ही 2017 मधील आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली आहे. शिवाय आता आधुनिक तंत्रज्ञानाचाही यात समावेश आहे. त्यामुळे पुणे मेट्रोचा खर्च 11 हजार 420 कोटी एवढा असणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मेट्रो प्रकल्प नफ्यात नाही
मेट्रोच्या तिकिटांचा दर व मेट्रोवरील खर्च विचारला असता विवेक गाडगीळ म्हणाले की, जगात सध्या कोणतीही मेट्रो नफ्यात नाही. कारण मेट्रो सरकारी असो किंवा खासगी त्यामध्ये तिकिटाचे दर सरकारच ठरवत असते. तसेच मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून उदयास आली आहे. त्यासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांना सामावून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे हे दर अगदी माफक असतात. यामध्ये पुढे जाऊन स्टॅम्प ड्युटी वाढली किंवा मेट्रोचा प्रवासी वाढला तरच फरक पडू शकेल. अन्यथा जगात एकही मेट्रो प्रकल्प नफ्यात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.