लोकवर्गणीतून करण्यात आले तलाव पुनर्भरण

0

बोदवड। अवर्षण प्रवण भागातील बोदवड तालुक्यात पिण्यापासून ते गुराढोरांच्या पाण्याची टंचाई पाचवीला पुजलेली. मोठी नदी किंवा लहान-मोठी धरणे नसल्याने टंचाईची दाहकता दरवर्षी वाढती. अशाच टंचाईमध्ये पोळणारे मानमोडी हे एक हजार लोकसंख्येचे गाव. वार्षिक सरासरी 400 मि.मी.पाऊस पडूनही केवळ पाणी अडवण्याची योग्य व्यवस्था नसल्याने गावाचा घसा कायम सुकलेला. मात्र, 2013मध्ये आदर्श गाव योजनेत समावेश झाल्याने मानमोडीने बदल अनुभवला. याच बदलातून 1980पासून दुर्लक्षित तलावाचे लोकसहभागातून पुनर्भरण झाले. परिणामी एरव्ही जानेवारीत तळ गाठणार्‍या तलावातील पाणी यंदा एप्रिलपर्यत पुरवता आले.

तरुणांनी दिलेले योगदान ठरले महत्वाचे
शासन, प्रशासन आणि लोकसहभागातून तलावाच्या पुनर्भरणाचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प यशस्वी ठरला. त्यात गावातील तरुणांनी दिलेले योगदानही तेवढेच महत्वाचे ठरले. यंदा याच तलावातील गाळाचा उपसा करून त्याची साठवण क्षमता अधिक वाढावी, यासाठी आतापासून प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात मानमोडी गावाजवळून वाहणार्‍या नाल्याचे खोलीकरण झाले. या नाल्यावर जलयुक्त शिवार योजनेतून सिमेंट बांध तयार झाला. यानंतर मे 2016मध्ये बांध ते तलाव, अशा दीड किलोमीटर अंतरात लोकवर्गणीतून तीन इंची पाइपलाइन टाकली गेली. जुलैत बंधारा तुंडुंब भरताच साडेसात अश्वशक्तीच्या पंपाद्वारे दिवसातून दररोज आठ तास, असे सलग अडीच महिने तलावात पाणी सोडून पुनर्भरणाचा प्रयोग यशस्वी झाला. परिणामी दरवर्षी जो तलाव जानेवारीतच कोरडाठाक व्हायचा, त्याने यंदा एप्रिलपर्यंत पाणी पुरवले.

मानमोडीच्या पूर्वेला 1880 मध्ये तलावाचे काम झाले होते. यानंतर दुर्लक्षित तलावात गाळ साचल्याने साठवण क्षमता घटली. तत्पूर्वी, आदर्शगाव योजनेतून डोंगरमाथ्यावर 20 हेक्टरवर डीप सीसीटीची कामे झाल्याने आजूबाजूची भूजल पातळी वाढली, तरी तलावातील आवक मात्र घटली. यामुळे तलाव जानेवारीत कोरडाठाक होत गुराढोरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला. मानमोडीकरांनी लोकसहभागातून तलावाच्या पुनर्भरणाचा विडा उचलला. तत्पूर्वी, जिल्हा प्रशासनाने तलावाचे पुनरुज्जीवन केल्याने गळती थांबून साठवण क्षमता वाढली.