मराठवाडा स्नेहसंमेलनात केले प्रतिपादन
पिंपरी : राज्य सरकारचे अत्यंत उत्तमरित्या काम सुरू आहे. सरकारमध्ये सर्व आलबेल आहे, असे असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे विरोधक अविश्वास ठरावासारख्या गोष्टी करून सभागृहाचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा विरोधकांना लोकशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे प्रतिपादन कामगार, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले. 31 मार्च रोजी लातूर येथे होणार्या मेट्रो कोच उत्पादन कारखाना भूमिपूजन सोहळ्यासाठी औद्यागिकनगरीतील मराठवाडावासियांना निमंत्रण देण्यासाठी मराठवाडा स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका योगिता नागरगोजे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, भारतीय मजदूर संघाचे अण्णा धुमाळ आदी यावेळी उपस्थित होते.
मराठवाडा स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न
संभाजी पाटील पुढे म्हणाले की, शेतकर्यांच्या प्रश्नावर सरकार आणि प्रशासन यांच्यात समन्वय दिसून येत नाही या प्रश्नावर असे काहीही नाही. असा अपप्रचार करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून केवळ लोकांची दिशाभूल करण्याचा त्याचा डाव आहे. राज्यातल्या आजपर्यंतच्या कुठल्याही सरकारने मराठवाड्यासाठी केलेल्या कामासाठी दोष देण्यात अर्थ नाही. मात्र, यापुढील काळात मराठवाडा स्वयंभू, स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न असणार आहे. मेट्रो कोच उत्पादन कारखाना उभारताना मराठवाड्यातील ऐंशी टक्के स्थानिकांना, भूमिपुत्रांना रोजगार देण्यावर भर राहणार आहे. टेंभूर्णी-लातूर रस्ता लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतील.