लोकसंख्येबरोबर वाहनांच्या वाढत्या संख्येचा ताण प्रशासनावर!

0

शहराची लोकसंख्या 22 लाख अन् वाहने 15 लाख

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर हे सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर आहे. गेल्या 20 वर्षात शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबच शहरातील वाहनांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहराची लोकसंख्या 22 लाखाच्या आसपास असून वाहनांची संख्या 15 लाख 68 हजार 607 इतकी आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढत्या वाहनांचा ताण प्रशासनावर पडताना दिसून येत आहे. महापालिकेने तयार केलेल्या ‘पार्किंग पॉलिसी’च्या धोरणामध्ये वाढत्या लोकसंख्येची आणि वाहनांची माहिती देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिकनगर आहे. देशाच्या काना-कोपर्‍यातून विविध नागरिक शहरात उपजिविकेसाठी येत असतात. त्यामुळे शहर झपाट्याने विस्तारात आहे. गेल्या 20 वर्षातील शहरातील वाढत्या लोकसंख्येवरुन हे स्पष्ट होत आहे. रोजगार मिळत असल्यामुळे नागरिकांची पिंपरी-चिंचवड शहराला पसंती आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शहराच्या लोकसंख्येत भर पडत आहे. तसेच या वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांच्या संख्येत देखील भर पडली जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळेच खासगी वाहने वाढत असल्याचे बोलले जात आहे.

2001 मध्ये 2 लाख वाहनसंख्या
गेल्या सहा वर्षात शहराची लोकसंख्या 22 लाखांच्या घरात गेली आहे. या वाढत्या लोकसंख्येबरोबच शहरातील वाहनांची संख्या देखील वाढली आहे. सन 2001 मध्ये शहरातील वाहनांची एकूण संख्या दोन लाख 10 हजार 556 होती. त्यामध्ये दुचाकी एक लाख 64 हजार 598, चारचाकी 20 हजार 489 तर इतर वाहने 25 हजार 478 होती. सन 2011 मध्ये या पाच वर्षात वाहनांची संख्या पाच लाखाने वाढून सात लाख तीन हजार 476 पर्यंत पोहचली. त्यामध्ये पाच लाख 37 हजार 920 दुचाकी, 90 हजार 346 चारचाकी तर 75 हजार 210 इतर वाहनांचा समावेश होता. सन 2017 मध्ये शहरातील वाहनांची संख्या 15 लाख 68 हजार 607 झाली आहे. त्यामध्ये 11 लाख 69 हजार 834 दुचाकी, दोन लाख 54 हजार 933 चारचाकी आणि एक लाख 43 हजार 840 इतर वाहने आहेत. म्हणजेच 22 लाख लोकांसाठी जवळपास 16 लाख वाहने आहेत. दरवर्षी नव्याने रस्त्यावर येणार्‍या वाहनांची संख्या वाढतच चालली आहे.

पीएमपीएमएलची दयनिय अवस्था!
पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. पीएमपीएलची अवस्था दयनीय झाली आहे. बसची संख्या कमी असून बस फे-या देखील कमी असतात. अनेक बस नादुरुस्त झाल्या आहेत. दर दिवशी दोन ते तीन पीएमपीएलच्या बस बंद पडलेल्या दिसून येतात. त्यामुळे नागरिक पीएमपीएलचा वापर न करता खासगी वाहनाचा वापर करत आहेत. परिणामी, वाहनांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत आहे.