‘लोकसंघर्ष’ने केली स्टोन क्रेशर बंद करण्याची मागणी

0

नंदुरबार । तालुक्यातील नवागांव येथील स्टोन क्रेशर बंद करण्यात यावे, अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चातर्फे करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवागांव व खैराळे (ता.नंदुरबार) येथे स्टोन क्रेशर मागील चार वर्षापासून आहे.

ग्रामसभेने कोणताही ठराव न देता स्टोन क्रेशरच्या मालकाने अवैधपणे खोदकाम व गौण खनिज काढण्याचा प्रकार सुरु केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, ज्या ठिकाणी काम चालू आहे, त्या ठिकाणी पंधरा फुटाचा खड्डा पडला असून वारंवार सुरुंग लावून होणार्या स्फोटामुळे परिसरात भिती निर्माण झाली आहे. या स्फोटामुळे गावातील लहान मुलांना ध्वनी प्रदुषणाचा त्रास मोठ्या प्रमाणावर होतो. पिकांवर व ग्रामस्थांच्या आरोग्यावरही परिणाम होवू लागला आहे. याची सखोल चौकशी करुन विशेष ग्रामसभा लवकरात लवकर लावण्यात यावी, अशी मागणी लोक संघर्ष मोर्चातर्फे महेंद्र टी. पाटील, अ‍ॅड.अनिल गावीत, प्रकाश गावीत, बुधा गावीत, राजाराम गावीत, अशोग गावीत, संदीप गावीत आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.