भुसावळ- बेरोजगार युवकांच्या विविध मागण्या तसेच न्याय हक्कासाठी भुसावळ ते जळगाव पायदळ मोर्चाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस.ग्राऊंड) पासून बुधवारी दुपारी तीन वाजता पायदळ मोर्चाला सुरुवात झाली. याप्रसंगी सरकारविरोधात मोर्चेकर्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, तरुणांना रोजगार नाही तर सरकार काय कामाचे यासह विविध घोषणा देण्यात आल्या. डी.एस.ग्राऊंड, गांधी पुतळा, नगरपालिका दवाखाना, बाजारपेठ, जामनेर रोड, अष्टभूजा मंदिर, नाहाटा महाविद्यालयामार्गे मोर्चेकर्यांनी नशिराबादकडे कुच केले. सायंकाळी नशिराबादला हा मोर्चा पोहोचल्यानंतर तेथे सभा होवून मोर्चेकरी मुक्कामास थांबतील तर 7 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता नशिराबादवरून निघून जळगावकडे मोर्चेकरी प्रयाण करून नंतर जिल्हाधिकार्याना निवेदन देणार आहेत.
जागोजागी पाण्यासह केळीची व्यवस्था
मोर्चेकर्यांसाठी जागोजागी दात्यांनी पाण्यासह केळीची व्यवस्था केली होती. नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी यांनी डी.एस.ग्राऊंडवर केळीचे तर जामनेर रोडवरील साईजीवनसमोर बिस्कीटांच्या पुड्यांचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसने दिला पाठिंबा
लोकसंघर्ष मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला. तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील, शहराध्यक्ष नितीन धांडे, युवक शहर अध्यक्ष रंजित चावरीया, मुन्ना सोनवणे, गोपाळ भदाणे, सागर पाटील, अमोल मांडे, राकेश पाटील आदी उपस्थित होते.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोर्चादरम्यान शहरातील तीनही पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांनी बंदोबस्त राखला. शिवाय मोर्चेकर्यांच्या मागे पालिकेचा अग्निशमन बंद, रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली. मोर्चामुळे तुरळक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली.