लोकसभा निवडणुकीत आघाडीला महाराष्ट्रातून चांगलं यश मिळेल – प्रफुल्ल पटेल

0

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. काँग्रेस पक्षासह समविचारी पक्षांशी आघाडी व्हावी, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत या आघाडीला महाराष्ट्रातून चांगलं यश मिळेल, असा विश्वास ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होणारच. जागावाटप चर्चेत आत्तापर्यंत ४० जागांबाबत बोलणी झाली असून २०-२० जागांचा सकारात्मक निर्णय झाला आहे. पण अजून 8 जागांचा निर्णय बाकी आहे, लवकरच त्याबाबतही निर्णय होईल. इतर मित्र पक्षांसोबाबत चर्चा होणार असून आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांना सोबत घेऊन आघाडी व्हावी, अशी पक्षाची इच्छा असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

पुणे लोकसभेच्या जागेसंदर्भात माध्यमांमधून चुकीची माहिती पसरवली जात आहे. मित्रपक्षासोबत चर्चा झाल्यानंतरच हा निर्णय आम्ही घेऊ, असेही ते म्हणाले.

अहमदनगरमध्ये सत्तास्थापनेबाबत जे झालं त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. ज्यांनी नगर मध्ये भाजप शिवसेनेला मदत केली, त्यांच्या विरोधात पक्ष कारवाई करणार आहे, अशी ठाम भूमिका पटेल यांनी मांडली.

केंद्र आणि राज्यसरकार बाबत लोकांमध्ये नाराजी आहे. शेतकरी वर्ग,कामगार वर्ग,युवक वर्गामध्येसुद्धा मोठी नाराजी आहे. राफेल घोटाळ्यामुळे हे सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये लोकांनी भाजप विरोधात मतदान केले आहे. महाराष्ट्रात लोकसभा पोटनिवडणूक झाली त्यावेळी भंडारा-गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजयी झाला. पालघर मतविभाजनामुळे भाजपाकडेच राहिला असला तरी आता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली असल्याचे मत पटेल यांनी मांडले.