लोकसभेतील दांड्या भोवल्या

0

नवी दिल्ली । लोकसभेतील 545 पैकी अवघ्या 5 खासदारांनीच संसदेत आपली 100 टक्के उपस्थिती लावली आहे. याचाच अर्थ हे खासदार लोकसभेतील प्रत्येक प्रश्‍न आणि चर्चेवेळी उपस्थित होते. ही आकडेवारी सध्याच्या लोकसभेतील तीन वर्षांतील आहे. उत्तर प्रदेशमधील बांदा येथील खासदार भैरोप्रसाद मिश्रा यांनी संसदेतील 1468 चर्चांमध्ये सहभाग नोंदवला आहे. संसदेत त्यांची 100 टक्के उपस्थिती राहिली आहे. खासदारांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवणारी स्वंयसेवी संस्था पीआरएस लेजस्लिव्हच्या माहितीनुसार सुमारे 133 खासदारांनी लोकसभेच्या 90 टक्क्याहून अधिक कामकाजात सहभाग नोंदवला. तर खासदारांच्या उपस्थितीची राष्ट्रीय सरासरी ही 80 टक्के आहे.

पंतप्रधान, काही मंत्री आणि सभागृह नेते आणि विरोधी पक्षांच्या उपस्थितीची आकडेवारी मिळू शकलेली नाही. कारण उपस्थितीसाठी आवश्यक असलेल्या नोंदवहीत त्यांनी स्वाक्षरी करणे बंधनकारक नसल्यामुळे त्यांच्याबाबत समजू शकले नाही. विशेष म्हणजे प्रकृती साथ देत नसतानाही काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या राहुल गांधींपेक्षा जास्त वेळा लोकसभेत उपस्थित होत्या. त्यांनी विविध चर्चांमध्ये सहभागही नोंदवला आहे. सोनिया गांधी या 59 टक्के तर राहुल यांची उपस्थिती ही 54 टक्के आढळून आली.

शंभर टक्के हजेरी
या आकडेवारीनुसार, लोकसभेत 100 टक्के उपस्थितीत राहणारे इतर चार खासदार पुढीलप्रमाणे- जगतसिंहपूरचे बिजू जनता दलाचे खासदार कुलमणी समल, उत्तर मुंबईतून निवडून आलेले गोपाळ शेट्टी, अहमदाबाद पश्‍चिमचे कीर्ती सोलंकी आणि सोनीपतचे खासदार रमेश चंदर.

हजेरीची टक्केवारी
समाजवादी पक्षाच्या खासदार आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या फक्त 35 टक्के संसदेत उपस्थित होत्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जे अजूनही खासदार आहेत. त्यांची सुमारे 72 टक्के उपस्थिती आहे. लोकसभेत सर्वाधिक कमी उपस्थिती ही मध्य प्रदेशातून भाजपचे खासदार असलेले ज्ञानसिंह यांची आहे. ते अवघे 8 टक्केच उपस्थित होते.

नेहमी आपल्याच पक्षाविरोधात वक्तव्य करणारे शत्रुघ्न सिन्हा यांची 70 टक्के उपस्थिती आहे. मथुरा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपच्या खासदार हेमामालिनी या केवळ 35 टक्के संसदेत उपस्थित होत्या. रिअ‍ॅलिटी शोमध्ये नेहमी दिसणार्‍या भाजप खासदार किरण खेर यांची उपस्थिती ही 86 टक्के इतकी आहे. गुजरातमधून निवडून आलेले परेश रावल यांची हजेरी ही 68 टक्के इतकी आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि वीरप्पा मोईली यांची क्रमश: 92 व 91 टक्के उपस्थिती होती. ज्योतिरादित्य शिंदे आणि राजीव सातव यांची हजेरी ही क्रमश: 80 टक्के व 81 टक्के इतकी आहे.