वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांचे भेटीगाठी, स्नेहमिलन!
पुणे/पिंपरी-चिंचवड : वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या शहरातील ज्येष्ठ नेत्यांनी आतापासून आपआपल्या परीने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी 2014 मध्ये काँग्रेसचे विश्वजित कदम यांच्याविरोधात विक्रमी मतांनी पुण्याची जागा जिंकली असली तरी, 2019मध्ये मात्र त्यांना उमेदवारी मिळविण्यासाठी झगडावे लागेल, असेच चित्र आहे. राष्ट्रीय राजकारणात सक्रीय असलेले व सद्या मध्यप्रदेशातून राज्यसभेवर गेलेले केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेदेखील पुण्यातून लोकसभेवर जाण्यास इच्छुक असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठस्तरीय नेतृत्वाने दिली आहे. त्यामुळे जावडेकर यांचे शहरातील दौरे वाढले असून, त्यांनी केडरबेस कार्यकर्त्यांकडे उठबस सुरु केली आहे. तसेच, जनसंपर्क वाढविण्यासदेखील सुरुवात केली आहे. दुसरीकडे, 2014 मध्येच लोकसभेसाठी इच्छुक असलेले ना. बापट आता 2019मध्ये तरी लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी वरिष्ठ पातळीवर संपर्क ठेवून आहेत. तसेच, शहरातही त्यांनी जोरदार संपर्क मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे खा. शिरोळे यांना 2019ची उमेदवारी फारसी सोपी नाही, असेही वरिष्ठस्तरीय सूत्र म्हणाले.
केंद्रीयमंत्री जावडेकरांची पुण्यातील उठबस वाढली!
पुणे शहरात भारतीय जनता पक्षाची चोहीकडेच सत्ता आहे. महापालिकेत, राज्यात आणि केंद्रातदेखील भाजपची सत्ता आहे. तसेच, शहरातील खासदारकी, शहरातून आठ आमदार, राज्यसभेची एक जागा अशी मोठी राजकीय ताकद भाजपची निर्माण झालेली आहे. त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक दिग्गज नेते आतापासून कामाला लागले आहेत. विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी, त्यांनी आतापासून जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी शुक्रवारी स्नेहमिलन कार्यक्रम घेऊन आपली राजकीय ताकददेखील दाखवून दिली. या कार्यक्रमाला सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह समाजातील विविध स्तरातील मान्यवरांची आवर्जुन उपस्थिती होती. अंतर्गत गटबाजी असलेल्या राज्यसभेचे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे, व पालकमंत्री गिरीश बापट यांनीदेखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर पुन्हा लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. लोकसभेसाठी अनेकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असली, तरी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव पक्षांतर्गत सर्वाधिक चर्चेत आहे. अलिकडे, ना. जावडेकर यांच्या पुण्यात भेटीगाठी वाढल्या असून, अनेक छोट्यामोठ्या कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. तसेच, पक्षाच्या केडरबेस कार्यकर्त्यांशीही ते संवाद साधत आहेत. ना. जावडेकर हे राष्ट्रीय राजकारणात रमले असले तरी, पुण्यातून लोकसभेवर जाण्यासाठी तेही इच्छुक आहेत, असेही वरिष्ठस्तरीय सूत्र म्हणाले.
मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता!
लोकसभा किंवा राज्यातील विधानसभा निवडणुका या पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच होण्याची शक्यता पाहाता, पक्षातील इच्छुक नेते निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांनी अलिकडेच केलेल्या वादग्रस्त विधानातून तसे संकेत दिले होते. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक आतापासून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावत आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांना 2014मध्येच लोकसभेची उमेदवारी पाहिजे होती. परंतु, त्यावेळी अनिल शिरोळे यांना ती संधी देण्यात आली. आता 2019साठीदेखील ना. बापट इच्छुक आहेत. त्यादृष्टीने त्यांनी चाचपणीदेखील केली असल्याचे वरिष्ठस्तरीय सूत्र म्हणाले. त्यामुळे खा. शिरोळे यांना पुन्हा उमेदवारी द्यावी की, ना. बापट यांना संधी द्यावी, असा पेच भविष्यात वरिष्ठस्तरीय नेतृत्वासमोर पडू शकतो. दुसरीकडे, मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघातही भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार महेश लांडगे हे इच्छुक आहेत. या दोन्ही मतदारसंघात सद्या शिवसेनेचे खासदार आहेत. त्यामुळे युती झाली तर या जागा मिळविण्यासाठी करावयाच्या वाटाघाटी किंवा युती न झाल्यास विद्यमान शिवसेना खासदारांना पाडण्यासाठी आखावयाची रणनीती, याबाबत आतापासून पक्षांतर्गत चर्चा सुरु झाली आहे. शिरुर मतदारसंघात तर आ. लांडगे यांनी आपले नेटवर्क वाढविण्यास सुरुवात केली असून, खा. आढळराव यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केलेले आहे.