लोकसभेसाठी शिवसेनेने भाजपसोबत यावे : आठवले

0

पुणे । शिवसेनेने 2019च्या निवडणुका भाजपसोबत लढणार नसल्याचे ठरवले मात्र ते आम्ही आधीच ठरविले असून उद्धव ठाकरे हे माझे मित्र असून माझा त्यांना सल्ला आहे की विधानसभेत त्यांनी काही ही करावे मात्र लोकसभेसाठी त्यांनी भाजपसोबत यावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिला.

शिवसेनेची मंगळवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत शिवसेना 2019ची निवडणूक भाजपसोबत लढणार नसून स्वतंत्रपणे लढणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. शिवसेना 150 आमदार आणि 50 खासदार निवडून आणणार असे घोषित केले.

आठवले म्हणाले, शिवसेनेने विधानसभेत त्यांनी काहीही करावे मात्र लोकसभेची निवडणूक भाजपसोबत लढावी, अशी माझी इच्छा असून उद्धव ठाकरे यांना मित्रत्वाच्या नात्याने सांगणार आहे. पेट्रोल भाववाढीबद्दल पत्रकारांनी विचारले असता हे सरकार सर्वसामान्यांचे असून कमी होईल, जीएसटीत देखील सरकारने सुधारणा केल्या आहेत काही टॅक्स कमी करून भाववाढ कमी करता येईल. तसेच भाजपचाच काळात नाही तर काँगे्रसच्या काळात देखील भाववाढ झाली होती. येणारा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असेल शेतकरी,आदीवासी, तसेच इतरांना अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल. भाववाढ कमी करण्याचा सरकार प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले.

मी लोकनेता…
आनंदराज आंबेडकर हे काल-परवा राजकारणात आले आहेत ते आपल्या बातम्या छापून याव्यात म्हणून बडबड करतात मला कोणाच्या तोंडाला लागायचे नाही. लोक माझ्या सोबत असतात. मी कुठे असेल तेथे लोक माझ्याकडे कामे घेऊन येतात त्यामुळे मी लोकनेेता आहे, असे आठवले म्हणाले.