बारामती । लोकसहभाग आणि विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून केलेल्या कामांमुळे तब्बल 100 कोटी लिटर क्षमतेची पाण्याची कामे झाली. तसेच शिक्षण, युवकांचे सबलीकरण या क्षेत्रातील कामे करण्यात आली असून ही कामे करण्यासाठी शासनाच्या बजेटनुसार तब्बल 5 कोटी रुपयांपर्यंत खर्च आला असता मात्र हीच कामे केवळ अडीच कोटी रुपयांमध्ये झाली असे जिल्हा परिषद सदस्य रोहीत पवार यांनी सांगितले.
बारामती तालुक्यातील शिर्सुफळ, निंबोडी, पारवडी, कटफळ, वंजारवाडीसह इंदापूर तालुक्यातील घोरपडी, वडापुरी या गावांमध्येही मोठ्या प्रमाणात ओढा खोलीकरण, तलाव खोलीकरण, तसेच बंधार्यांची दुरुस्ती यासह इतर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. सद्य:स्थितीत जिल्हा परिषदेकडे निधीच उपलब्ध नसल्यामुळे सदस्यांना विविध विकासकामे करणे मुश्किल झाले आहे. मात्र, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी मात्र शासकीय निधीची वाट न पाहता लोकसहभागातून कामे करण्यावर धडाका लावला आहे.
रोहीत पवार यांनी केवळ स्वत:च्या मतदारसंघातच नाही तर संपूर्ण बारामती आणि इंदापूर तालुक्यातील काही गावांमधील कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे या गावांमध्ये दुष्काळाची तीव्रता नाहीशी होण्यास मदत झाली आहे. जिल्हा परिषदेच्या आणि नगरपरिषदेच्या काही शाळांमध्येही ई-लर्निंग सेट देण्यात आले आहेत. यामध्ये मोठा लॅपटॉप, स्पिकर, शिक्षकांना टॅब, प्रोजेक्टर, ई-लर्निंग सॉफ्टवेअर व्हिज्युअलायझर देण्यात आले. यासाठी लोकसहभागातून 15 हजार रुपये जमा करण्यात आले व उरलेले 1 लाख 25 हजार रुपये सीएसआर निधीतून देण्यात आले.
आयुकाबरोबर करार
विद्यार्थ्यांमध्ये प्रॅक्टिकल शिक्षणाचे महत्त्व वाढविण्यासाठी आयुकाबरोबर करार करण्यात आला असून यातून विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र दाखविण्यात येत आहे. या उपक्रमांमधून जिल्हा परिषदेच्या व नगरपरिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये खासगी शाळेतील मुलांइतकेच महत्त्व दिले जात असल्याचा संदेश जात आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाचा सेट बनविण्यात आले आहेत. त्यातून प्रात्यक्षिके दाखविण्यात येत आहेत. ही सर्व कामे अवघी अडीच कोटी रुपयांमध्ये झाली. हीच कामे शासकीय यंत्रणेमार्फत केली असती तर ती पाच कोटी रुपयांपर्यंत गेली असती. यासाठी पॅजो, मगरपट्टा, भारत फोर्ब्ज, बारामती अॅग्रो, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, क्वेट फाउंडेशन, कीटूकॅट यांची मदत झाली आहे.
लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
ओढा व तलाव खोलीकरण तसेच बंधार्यांची दुरुस्ती ही कामे लोकसहभागातून करण्यात आली आहेत. ही कामे करताना गावातील एखाद्या जरी शेतकर्याने विरोध केला तरी तेथील कामे केली जात नव्हती. विरोध असेल तिथे कामे केली नाहीत ही कामे करताना लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला त्यामुळे 5 कोटी रुपयांची कामे अवघ्या अडीच कोटी रुपयांमध्ये करता आली.
– रोहित पवार,
सदस्य, जिल्हा परिषद