लोकसहभागातून स्वच्छ सर्वेक्षणाला गती

0

नवी मुंबई । स्वच्छ भारत अभियानांंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये स्वच्छ शहर मानांकन उंचावून देशात प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळविण्यासाठी नवी मुंबई शहर सज्ज झाले असून या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशनचे संचालक व्ही. के. जिंदाल यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला भेट देऊन शहरातील स्वच्छता विषयक कामांची पाहणी केली व लोकसहभागातून नवी मुंबई शहराची स्वच्छ व सुंदर शहर म्हणून प्रगती होत असल्याबद्दल प्रशंसा केली. स्वच्छ भारत मिशनचे केंद्रीय संचालक व्ही. के. जिंदाल यांनी ऐरोली येथील माईंड स्पेस उद्योग समूहातील खत निर्मिती प्रकल्पाची महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. आणि संबंधित अधिकार्‍यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. त्याठिकाणी कंपनीच्या उपाहारगृहातील ओला कचरा तसेच आवारातील हरित कचरा यापासून तयार होणार्‍या खतातून कंपनीच्या आवारातच बाग बगिचा तसेच हिरवळ विकसित करण्यात आली असून त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

वाशी बस डेपोची पाहणी करताना व्यक्त केले समाधान
कोपरखैरणे येथील जुनी क्षेपणभूमी शास्त्रीय पद्धतीने बंद करून त्याठिकाणी फुलवण्यात आलेल्या निसर्गोद्यानाच्या भेटीमध्ये त्याठिकाणी महानगरपालिकेमार्फत निर्माण करण्यात येणार्‍या नियोजित सॅनिटेशन पार्क या अभिनव संकल्पनेचे त्यांनी मुक्त कंठाने कौतुक केले. घनकचरा, सांडपाणी अशा महत्वाच्या बाबींच्या विल्हेवाटीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत तसेच त्यासाठी राबवावयाचे विविध प्रकल्प, उपक्रम याविषयी माहिती देणारा हा सॅनिटेशन पार्क विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी तसेच स्वच्छतेविषयी जाणीव जागृती करणारा ठरेल अशा शब्दात व्ही.के.जिंदाल यांनी या अभिनव संकल्पनेची प्रशंसा केली. अशाचप्रकारे तुर्भे येथील शास्त्रोक्त भू-भरणा पध्दतीवर आधारीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे कौतुक केले. वाशी बसडेपो परिसराची पाहणी करताना त्यांनी तेथील सफाईबाबत समाधान व्यक्त केले. तसेच सार्वजनिक ठिकाणी महिलांना होणारी अडचण दूर करण्यासाठी राबविलेली ’शी’ टॉयलेट ही संकल्पना अभिनव असल्याचे गौरवोद्गार काढले. सानपाडा येथील मिलेनियम टॉवर गृहनिर्माण संस्थेला भेट दिल्यानंतर त्याठिकाणचे रहिवासी विशेषत्वाने महिला स्वयंस्फूर्तीने ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे कौतुक केले. सेक्टर 19 नेरूळ येथील वंडर्स पार्कला भेट दिल्यानंतर तेथील सेव्हन वंडर्सची जागतिक संकल्पना आणि आल्हाददायक वातावरण याबद्दलही त्यांनी चांगली सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला तसेच वंडर्स पार्कमधील कंपोस्ट पिट्स बघून सर्वच उद्यानात कंपोस्ट पिट्स केल्याबद्दल कौतुक केले.स्वच्छ संदेशाच्या प्रसारासाठी विद्यार्थ्यांना एकत्र करून घेतलेली विक्रमी वॉकेथॉन, चित्रकला स्पर्धा, शाळाशाळांतून राबवलेली क्लिनलिनेस सोल्जर ही संकल्पना, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता ग्रिटिंग्स, पपेट शो, पथनाट्ये अशा वैशिष्टपूर्ण उपक्रमांबद्दल त्यांनी उत्तम काम असे अभिप्राय दिले.