अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांचे प्रतिपादन
जळगाव – ग्रामीण भागातील लोकांच्या सवयीत जोपर्यंत बदल होणार नाही. तोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रत्येक खेडे हे हगणदारीमुक्त म्हणता येणार नाही, असे प्रतिपादन जिल्हापरिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी केले. जळगांव जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शाश्वत स्वच्छता व मैला गाळ व्यवस्थापन या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. उज्वला पाटील, शिक्षण व अर्थसमिती सभापती पोपट भोळे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक विनोद रापतवार, प्रायमुव्ह संस्थेचे मुख्य प्रशिक्षक लक्ष्मीकांत शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील आदि उपस्थित होते.
ग्राम स्वच्छतेसाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यभर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कालमर्यादेत यशस्वीपणे राबवून दाखविले. तथापि या मिशनमध्ये असंख्य गावांमधून लोकांचा सकारात्मक सहभाग नसल्याने शासनाला त्यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आलेली आहे. जिल्हापरिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत यावर आता विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून यात ग्राम पातळीवर अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी असे आवाहन संजय मस्कर यांनी केले.
लोकांचा योग्य प्रतिसाद आजही स्वच्छता मिशनला मिळत नसल्याची खंत सभापती पोपट भोळे यांनी व्यक्त केली. ग्राम पातळीवरील लोक सहभागासाठी सर्व लोकप्रतिनिधी पुढे सरसावतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या या उपक्रमात गांधी रिसर्च फाऊंडेशनचा ग्राम विकास विभाग सहभाग घेईल. असे गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक विनोद रापतवार यांनी सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक प्रतिनिधी, जिल्हा कक्षातील तज्ज्ञ सल्लागार, गट समन्वयक व समुह समन्वयक आदि उपस्थित होते.