लोकसहभागाशिवाय लोकशाही अपूर्ण!

0

पुणे । लोकशाही ही अतिशय उत्तम यंत्रणा आहे. मात्र ती यशस्वी करण्याकरिता लोकांचा सहभाग असणे अत्यावश्यक आहे. लोकसहभागातून मोठ्या सरकारी योजना अल्पकाळात राबवता येतात. याचे एक उदाहरण म्हणजे जलयुक्त शिवार योजना. या योजनेअंतर्गत आमीर खान सोबत वॉटर कप स्पर्धा घेऊन त्यात लोकसहभाग निर्माण केला. यामुळे जवळपास 20 ते 22 हजार गावातील दुष्काळ दूर झाला. त्यामुळे कोणतीही सरकारी योजना यशस्वी करण्यासाठी लोकसहभागाची गरज मोठ्या प्रमाणात असते, त्याशिवाय लोकशाही अपूर्ण आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

सामाजिक संस्थांच्या कामाचे प्रदर्शन
अनुलोम (अनुगामी लोकराज्य महाअभियान) आयोजित सारथ्य समाजाचे विकास मेळाव्यात ते बोलत होते. शासकीय योजनांच्या माहितीचे व विविध सामाजिक संस्थांच्या कामाचे भव्य प्रदर्शन बुधवारी गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत भरवण्यात आले होते. याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे, जलमानव राजेंद्र सिंग, महाराष्ट्राचे मुख्य प्रधान सचिव प्रवीण सिंग परदेशी, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्राकांत दळवी, अनुलोमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल वझे, महापौर मुक्ता टिळक, उद्योजक कृष्णकुमार गोयल, अमित गोरखे, आदी उपस्थित होते.

संस्थांनी एकत्र येऊन काम करावे
मुख्यमंत्री म्हणाले, समाजातील निष्क्रिय आणि नकारात्क शक्तींवर मात करण्यासाठी अनुलोम सारख्या संघटनांची नितांत आवश्यकता आहे. अशा संस्थांच्या माध्यमातूनच सरकारच्या योजना खर्‍या गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतात. अनुलोममुळे हे काम सहज शक्य झाले आहे. अनुलोम आणि त्यासारख्या संस्थांनी एकत्र येऊन काम केले तर दहा वर्षाचे काम केवळ दोन वर्षात पूर्ण करता येईल. स्वयंसेवी संस्था जर एकत्रितपणे पुढे येऊन त्यांनी सरकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले तर दलालांची गरज भासणार नाही आणि योजना यशस्वी देखील होईल. महाराष्ट्रात जवळपास आठ लाखांच्या आसपास स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. या सर्वांनी एकत्रित येऊन काम केल्यास 2020 पर्यंत निश्‍चितच अब्दुल कलामांच्या स्वप्नातील भारत साकार होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.