लोकांनी काय खावे, हे सरकार ठरवत नाही

0

नवी दिल्ली। गोमांस सेवन, गोमांस व्यापार, कत्तलखाने यांच्यावरून देशभरात वातावरण तापले असताना मोदी सरकारमधील एका मंत्र्याने महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ‘लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये, हे सरकार ठरवत नाही,’ असे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटले आहे. मद्रासमध्ये आयोजित करण्यात आलेला ‘बीफ फेस्ट’ आणि केरळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली वासराची हत्या या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी भाष्य केले.

आठवडी बाजारात जनावरांची कत्तलखान्यांसाठी विक्री केली जाऊ नये, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयावर आणि या निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना अर्जुन मेघवाल यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. ‘लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये, हे सरकार ठरवत नाही,’ असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी म्हटले.

केरळमध्ये काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी एका वासराची कत्तल केली होती. यावर बोलताना अर्जुन मेघवाल यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘यातून काँग्रेसची संस्कृती दिसते,’ असे म्हणत मेघवाल यांनी काँग्रेसवर शरसंधान साधले. ‘सरकारने देशाच्या विकासासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली जगभरात भारताची प्रतिमा झळाळून निघाली आहे. एक श्रेणी, एक निवृत्तिवेतन योजनेमुळे माजी सैनिकांना फायदा झाला आहे. यासोबतच सरकारच्या इतर निर्णयांमुळे देशाच्या विकासाचा वेग वाढला आहे,’ असेदेखील मेघवाल यांनी म्हटले.