लोणावळा : शासनाच्या निर्देशानुसार लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने ‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेची सुरुवात शनिवारी करण्यात आली आहे. या मोहिमेच्या सुरुवातीलाच कचरा साठवून ठेवणार्या हॉटेल्सला नगरध्यक्षा सुरेखा जाधव यांनी दणका दिला. दंडात्मक कारवाईसह अशा हॉटेलांचे नळजोड कापण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. या मोहिमेमध्ये नगराध्यक्षा जाधव या स्वतः कचरा उचलून भरत होत्या. ‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमे अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने शनिवारी मनःशक्ती केंद्र ते कुमार रिसॉर्ट या दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने सफाई अभियान राबविण्यात आले. या अभियानात नगराध्यक्षा सुरेखा जाधव, आरोग्य सभापती ब्रीनदा गणात्रा, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्यासह नगरपरिषदेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
हे देखील वाचा
स्वच्छता अभियानात 7वा क्रमांक
लोणावळा नगरपरिषदेचा 2018 च्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात संपूर्ण भारतात सातवा क्रमांक आला होता. आगामी 2019 च्या सर्वेक्षण मध्ये प्रथम क्रमांक मिळविण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद जोरदार तयारी करीत आहे. शनिवारी सुरू केलेल्या अभियानाच्या सुरुवातीलाच वळवण येथील हॉटेल एन एच 4, सेन्टर पॉईंट, हॉटेल आश्रय, देशी फूड पॉईंट, कुणाल बार अँड रेस्टॉरंट या हॉटेलच्या परिसरात तसेच दर्शनी भागात कचर्याचे ढीग आढळून आल्याने नगराध्यक्षा जाधव यांचा पारा चढला. या सर्व हॉटेल व्यवस्थापनाला जोरदार शाब्दिक प्रसाद देत संबंधित हॉटेलांवर जबर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश नगराध्यक्षा जाधव यांनी प्रशासनाला दिले. तर त्याचवेळी मुख्याधिकारी सचिन पवार यांनी या हॉटेलचे नळ कनेक्शन कापण्याचे आदेशही दिले. जोवर या हॉटेल व्यवस्थापनाकडून याबाबत योग्य कारण आणि भविष्यातील उपाययोजनांची माहिती दिली जात नाही तोवर नळ कनेक्शन पुन्हा जोडण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.