स्थानिक व्यावसायिकांकडून होते दादागिरी
लोणावळा : पर्यटन नगरी म्हणून ओळख असणार्या लोणावळा शहरात पर्यटनासाठी आलेल्या गुजरात येथील पर्यटकांना टायगर पॉईंट याठिकाणी स्थानिक व्यावसायिकांनी जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. गुजरातमधील वडोदरा येथून मेमन कुटुंबातील 24 ते 25 जणांचा ग्रुप पर्यटनासाठी म्हणून लोणावळ्यात आला होता. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण टायगर पॉईंट याठिकाणी सनसेट बघण्यासाठी गेले होते. टायगर्स पॉईंट आणि लायन्स पॉईंट हे जवळजवळ असून त्याठिकाणी अनेक स्थानिक लोक लहान-मोठा व्यवसाय करीत असतात. काहीजण उंट आणि घोड्यावरून पर्यटकांना रपेट मारून आणण्याचाही व्यवसाय याठिकाणी करतात. अशाच एका घोड्यावाल्याने घोड्यावर मुलांना बसविल्यानंतर ठरल्यापेक्षा जास्त रक्कम मागितल्याने घोडेवाला आणि या पर्यटकांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान त्याठिकाणी आजूबाजूचे इतर स्थानिक व्यावसायिकही जमा झाले आणि हा वाद वाढत जाऊन त्याचे पर्यवसान पुढे हाणामारी मध्ये झाले.
काठी, पाईप, काचेच्या बाटल्यांनी मारहाण
हे देखील वाचा
स्थानिकांनी काठी, पाईप आणि काचेच्या बाटल्यांनी मेमन कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे मारहाण करण्यात स्थानिक महिलाही सामील झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या हाणामारीमध्ये पर्यटक पुरुषांसोबत महिलांनाही मारहाण करण्यात आली. तसेच त्यानंतर या पर्यटकांना त्याठिकाणी अडवून ठेवण्यात आले आणि तेथून सोडण्यासाठी पैसेही घेण्यात आल्याचा आरोप या मारहाण करण्यात आलेल्या पर्यटकांनी केला आहे. शिवाय या मारहाणीदरम्यान मेमन कुटुंबियांनी आपल्या 92 हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याची तक्रार केली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या पर्यटकांना लोणावळ्यातील परमार हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. आसिफ रफिक मोतीवाला (वय 28), अहमद अब्दुल रझ्झाक मेमन (वय 25), सुफीयान अब्दुल रझ्झाक मेमन (वय 29), रईसा अब्दुल रझ्झाक मेमन (वय 50) आणि नसर मेमन ईबाद मेमन (सर्व राहणार बेनझीर पार्क, विना नगर, वडोदरा, गुजरात) अशी जखमींची नाव आहे.
पोलिसांकडून दरोड्याचा गुन्हा दाखल
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी आरोपींच्या विरोधात जबर मारहाण तसेच दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलोसांनी मंगळवारी दुपारपर्यंत तानाजी शिवाजी राजीवडे (20), चंद्रकांत यशवंत टाकावे (31), विश्वास यशवंत टाकावे (42), राजेश बद्री जाधव (23, सर्व रा.आतवन) या चार आरोपींना अटक केली असून वडगाव न्यायालयाने या आरोपींना 19 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास पो.नि. रामदास इंगवले यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस करीत असून पोलिसांच्या दोन पथके रवाना करण्यात आल्या आहे.