पुणे : मावळचे महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आज लोणावळा शहरात सिने अभिनेत्री आणि अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या नवनीत कौर राणा यांचा रोड शोझाला. या रोड शो दरम्यान काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की झाल्याची घटना घडल्याने काही पदाधिकारी रॅली अर्धवट सोडून निघून गेले.
प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरात आज सकाळी नवनीत कौर राणा यांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. मात्र साडेबारा वाजेपर्यत राणा न आल्याने रॅलीच्या ठिकाणी आलेल्या पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा अर्चना शहा यांचाच रोड शो सुरु करण्यात आला. काही अंतर चालून गेल्यावर हा रोड शो थांबवत पुन्हा राणा यांची वाट पाहण्यात आली. दरम्यान शिवाजी महाराज चौकत दाखल झालेल्या नवनीत राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत रोड शो ला सुरुवात केली. मात्र यावेळी काँग्रेसच्या शहा व इतर मंडळींना बाजुला सारत राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे केवळ राणा यांनाच घेऊन चालू लागल्याने महिला पदाधिकारी व काँग्रेस पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली.