लोणावळ्यात गौरी व गणपतीचे विसर्जन

0

लोणावळा । लोणावळेकरांनी गुरुवारी आपल्या घरी सात दिवसांचे पाहुणे म्हणून आलेल्या गौरी आणि गणपती बाप्पाला मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.

गौरी गणपतीच्या विसर्जनासाठी लोणावळेकर मोठ्या उत्साहाने बाहेर पडलेले दिसत होते. यंदा डीजे सिस्टीम वर पूर्णतः बंदी घालण्यात आली. मात्र त्याचा कोणताही परिणाम गणेशभक्तांच्या उत्साहावर झालेला दिसला नाही. ढोल-लेझीम तसेच बॅन्डच्या साथीने यंदा सात दिवस मुक्कामी आलेल्या घरगुती तसेच काही सार्वजानिक मंडळाचे गणपतीचे विसर्जन झाले.

गुलालाची उधळण करीत स्त्रिया व पुरुष तसेच लहान मुले गौरी-गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत धुंद होऊन नाचत होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषाच्या निनादात चाललेल्या मिरवणुकापुढे स्त्रिया आणि मुली फेर धरून झिम्मा व फुगडी खेळतानाचे दृश्य सर्वत्र दिसत होते. लोणावळा डॅम, वलवन तलाव, खंडाळा तलाव, इंद्रायणी नदी तसेच तुंगार्ली येथील तुंगरेश्वर मंदिर विहीर या ठिकाणी भाविक गौरी-गणेश विसर्जनासाठी जमा झाले होते. विसर्जना दरम्यान कोठेही काही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व ठिकाणी तसेच सर्व मिरवणुका सोबत लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.