तिथीनुसार साजरी करण्यात येणारी शिवजयंती उत्साहात साजरी
लोणावळा । तिथीनुसार येणारी शिवजयंती विविध सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांनी रविवारी मोठ्या उत्साहात लोणावळ्यात साजरी करण्यात आली. शहराच्या आजूबाजूला असलेल्या राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, कोराईगड, धनगड यासारख्या किल्ल्यावरून शिवज्योत पेटवून आणलेल्या शिवज्योतीची शहरात मिरवणूक काढण्यात आल्या होत्या. शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी चौकात कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह बघायला मिळात होता.
मिरवणुका पाहण्यासाठी गर्दी
छत्रपतींच्या तसेच मावळ्यांच्या वेशात आणि संपूर्ण भगव्यामय वातावरणात हजारो शिवभक्त राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करीत छत्रपतींच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होत होते. रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या शिवज्योत मिरवणुका बघण्यासाठी शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी चौकात आणि मुख्य बाजार पेठेतील रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.
शस्त्र प्रदर्शन
ढोल-ताशांच्या निनादात जय शिवाजी, जय भवानीच्या जय घोषात निघालेल्या या मिरवणुकांमध्ये तरुणांची आणि विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय होती. महिला पारंपारिक वेशभूषा धारण करून रॅली आणि मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या मिरवणुकांचे स्वागत छत्रपती शिवाजी चौकात योध्दा प्रतिष्ठान तर जयचंद चौकात लोणावळा शहर शिवसेनेकडून करण्यात येत होते. याठिकाणी शिवभक्तांना मोफत पाणी, सरबत तसेच फळ आणि अल्पोपहार यांचे वाटप करण्यात येत होते. शिवजयंतीनिमित्त शहरात विविध भागात शस्त्र प्रदर्शन, शरीर सौष्ठव स्पर्धा, शिव व्याख्याने, मिरवणुका तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आणि महाराजांच्या जीवनपटावर आधारलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.