जोर कायम : नदी, नाले तुडूंब लागले वाहू
लोणावळा : लोणावळा शहरात मागील 24 तासात 151 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी दुपारपासून शहरात सुरु असलेला पाऊस आज देखील कायम असल्याने नदी नाले तुडूंब भरुन वाहू लागले आहेत.गवळीवाडा येथील राशिंगकर घरासमोरील रस्त्यावर तसेच परमार दवाखाना, नीलकमल थिएटर समोरील रस्ता, नारायणीधामकडे जाणारा रस्ता, ट्रायोज मॉल समोरील रस्ता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना प्रवास करणे अवघड झाले होते. नांगरगावातील जाधव कॉलनी व भांगरवाडीतील निशिगंधा सोसायटी याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रहिवाश्यांना या पाण्यातून घरात जावे लागत आहे.
हौसिंग सोसायट्यांमध्ये पाणी
सोसायट्यांना पाण्याचा विळखा बसला आहे. ग्रामीण भागात सदापुर पुलाला आडकलेली जलपर्णी अजून तशीच असल्याने चार दिवसापासून वाकसई चाळ, सदापुरच्या परिसरात पुराचा विळखा कायम आहे. मुसळधार पावसाने डोंगरभागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ होऊ लागली आहे. मावळ तालुक्यासस पिंपरी चिंचवडकरांची तहान भागविणार्या पवना धरणाच्या पाणीसाठ्या मागील चोवीस तासात सात टक्क्यांची वाढ झाली असून आजमितीला धरणात 31.92 टक्के पाणीसाठा झाला आहे. पवना धरण क्षेत्रात मागील चोवीस तासात 132 मिमी पाऊस झाला आहे.