लोणी-काळभोरमध्ये बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

0

पुणे : पुणे जिल्ह्यातल्या लोणी-काळभोळ येथे एका बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. गेल्या ७ महिन्यात मृत अवस्थेत बिबट आढळल्याची तालुक्यातील ही सहावी घटना आहे. त्यामुळे बिबट्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आळंदी महातोबाची गावाच्या हद्दीतील रामोशीवाडी परिसरात डोंगराच्या पायथ्याशी एका बिबट्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडला. गुरांना चारण्यासाठी डोंगरात घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांने बिबट्याला पाहिले. गावामध्ये जाऊन ही माहिती त्यांनी गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी वन विभागाला याची माहिती दिली असता वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. त्याचसोबत लोणी काळभोर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा बिबट्या पाण्याच्या शोधात याठिकाणी आला असावा. तसंच त्याला पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय वन विभागाने व्यक्त केला आहे.