पुणे । हवेली तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी माजी सरपंच, ग्रामसेवक आणि 11 सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी यासंदर्भात हवेलीच्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना आदेश दिले आहेत.
लोहगाव येथील बाजार कर वसूल करण्याचे अधिकार बेकायदेशीरपणे संत तुकाराम महाराज अजोळ ट्रस्टला देण्यात आले होते. ठेकेदाराने या कराची 27 लाख 90 हजार रक्कम ग्रामपंचायती एवजी ट्रस्टकडे जमा करून गैरव्यवहार केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांची चौकशी सुरू होती. या चौकशीचा अहवाल पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनी जिल्हा परिषदेकडे दिला होता. त्यानुसार ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
अपहाराची रक्कम वसूल करा
या प्रकरणाला तत्कालीन ग्रामसेवक व माजी सरपंच जबाबदार आहेत. त्यांच्यासह ग्रामपंचायतीचे अन्य सदस्य देखील यासाठी जबाबदार असून या सर्वांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिले. गुन्हे दाखल करण्याबरोबरच अपहाराची रक्कम संबिधतांकडून वसूल करण्यात यावी, असाही आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी बजावला आहे.
बाजार कर ठेकेदाराने केला हडप
लोहगाव येथील बाजार कर वसूल करण्याचा अधिकार संत तुकाराम महाराज अजोळ ट्रस्टला देण्यात यावा, याबाबत ग्रामपंचायतीने 2013 मध्ये ठराव केला होता. त्यानुसार कर वसुलीचा ठेका खासगी ठेकेदारास देण्यात आला होता. करापोटी ठेकेदाराने 27 लाख 90 हजार रुपयांची रक्कम जमा केली होती. ही रक्कम ग्रामपंचायतीला जमा करणे अपेक्षित होते. परंतु, तसे न करता ती ट्रस्टकडे जमा केली.
कागदपत्रे केली गहाळ
बाजार कर ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची बाब आहे. त्याकरीता ग्रामपंचायतीने संबंधित ठेकेदारास रितसर पत्र देऊन बाजार कर वसुलीचा ठेका देणे व त्यासाठी अटी शर्तीनुसार करारनामा करून घेणे या प्रक्रिया राबविल्या नाही. ग्रामपंचायतीने बेकायदेशीररित्या ठराव करून बाजार कर वसुली डिसेंबर 2013 ते जानेवारी 2015 अखेरपर्यंत संत तुकाराम महाराज ट्रस्टकडे सोपविली. ट्रस्टने जमा केलेला कर पंचायतीकडे जमा करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. यातून अपहार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. लोहगाव ग्रामपंचायतीने बाजार कराची वसुली करण्यासंदर्भातील कागदपत्रे, कराची जाहिरात करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक गहाळ केल्याचे स्पष्ट होत आहे.