लोहगाव विमानतळ परिसरात वृक्षारोपण मोहीम

0

पिंपरी-चिंचवड : पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने भारतीय हवाई दलाच्या लोहगाव विमानतळ परिसरात श्रमदानातून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत 500 रोपे लावण्यात आली. या मोहिमेत हवाई दलाचे अधिकारी व कर्मचारी कुटुंबीयांसह सहभागी झाले होते. या मोहिमेसाठी आवश्यक देशी प्रजातीची रोपे तसेच सहा टन सेंद्रीय खत पर्यावरण संवर्धन समितीने पुरविले होते. समितीचे अध्यक्ष विकास पाटील, विनिता दाते यांनी हवाई दलाचे अधिकारी एअर कमांडर के. व्ही. सुंदारण नायर यांच्याशी हा उपक्रम राबविण्याबाबत चर्चा केली होती. त्यांची अनुमती मिळाल्यानंतर 1 ते 12 जुलै दरम्यान हा उपक्रम पार पडला.

विविध जातीची रोपे लावली
हवाई दलाच्या ताब्यातील लोहगाव विमानतळ परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. जांभूळ, कडूलिंब, बदाम, पिंपळ, आंबा, गुलमोहर, आवळा, रिठा, चाफा आदी प्रकारची कमीत कमी सहा ते सात फूट उंचीची रोपे लावण्यात आली. या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी हवाई दलाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी घेतली आहे.

शाळांमध्येही जनजागृती होणार
पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने यापुढे लोहगाव विमानतळ परिसरातील सर्व शाळांमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून कमीत कमी दोन रोपे पिशवीत बनविण्याची मोहीम सुरू केली जाणार आहे. त्यासाठी लागणारे बियाणे समितीतर्फे पुरविण्यात येईल, असेही समितीने कळविले आहे.