लोहमार्ग पोलिसासह तिघांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा

0

भुसावळात कुंपणानेच खाल्ले शेत ; दरोडेखोरांच्या अटकेनंतर समोर आला प्रकार ; बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून ‘लोहमार्ग’कडे केला वर्ग ; रक्कम डबलच्या आमिषाने खंडव्याचा व्यापारी शहरात आल्याची चर्चा ; तक्रारदाराच्या जवाबानंतर सत्य येणार बाहेर

भुसावळ- खंडव्याच्या लाकूड व्यापार्‍याला लुटून भुसावळात दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या मध्यप्रदेशासह भुसावळ, अकोल्यातील आठ संशयीत दरोडेखोरांच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांच्या तपासात आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेली तीन लाखांची रोकड अटकेतील दोन संशयीतांनी रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसाच्या उपस्थितीत लुटून पोबारा केल्याची कबुली बाजारपेठ पोलिसांना दिल्यानंतर तिघाही संशयीतांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करून तो भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. दरोड्याच्या गुन्ह्यात लोहमार्ग पोलिसाचे नाव पुढे आल्याने लोहमार्ग पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने लोहमार्ग पोलिसांनी गुरुवारी घटनेच्या दिवशीचे फुटेज तपासले असून तक्रारीत तथ्य जाणवत असल्याचे समजते. दरम्यान, खंडव्याचा लाकूड व्यापारी भुसावळात पैसे दुपटीच्या आमिषानेदेखील आल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

व्यापार्‍याला लुटल्याने दोन गुन्हे उघड
समजलेल्या माहितीनुसार, खंडव्याचा लाकूड व्यापारी शंकर बिरबल पासी (लंकड बाजार, खंडवा) हे मंगळवारी भुसावळातील रीक्षा चालक असलेल्या भावाला उधारीचे पाच लाख रुपये देण्यासाठी आले होते व त्याचवेळी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर एका लोहमार्ग पोलिसाच्या उपस्थितीत दोन संशयीतांनी त्यांच्या हातातील बॅग लांबवून पोबारा केला. पासी यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत कैफियत मांडल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी शहरात आरोपींचा शोध घेतला मात्र ते महामार्गावरील एका ढाब्यावर जेवण करीत असल्याचे कळाल्यानंतर बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. आरोपींच्या ताब्यातून दरोड्याच्या साहित्यासह दोन चारचाकी तसेच तीन लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. बाजारपेठ पोलिसांनी आठही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना रविवार, 21 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसासह तिघांविरुद्ध दुसरा गुन्हा
खंडव्याचा व्यापारी पासी यास लुटल्याची आरोपींनी कबुली दिल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यात एका लोहमार्ग पोलिसासह अटकेतील आठ पैकी दोन आरोपींनी व्यापार्‍याच्या ताब्यातून बॅग ताब्यात घेतल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याने बाजारपेठ पोलिसांनी आठ आरोपींनी भुसावळात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा तर दुसरा गुन्हा व्यापार्‍याला लुटल्याचा दाखल केला आहे. हा गुन्हा तपासासाठी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. लोहमार्ग पोलिसांनी लुटीचा गुन्हा गुरुवारी दाखल करून घेतला. पोलिस निरीक्षक दिलीप गढरी यांनी या अनुषंगाने लूट झाल्याच्या दिवसाचे फुटेज तपासले. त्यात प्लॅटफार्म क्रमांक तीनवर तक्रारदार व संशयीत दिसत नसलेतरी दादर्‍यावर आरोपींच्या मागे तक्रारदार चालत असल्याचे दिसल्याचे गढरी म्हणाले.

रक्कम डबल करण्याच्या उद्देशाने लूट ?
खंडव्याचा व्यापारी भुसावळात भावाला पैसे देण्यासाठी आल्याचे सांगत असलातरी गावात असलेल्या भावाकडे ते का गेले नाहीत? असा प्रश्‍न लोहमार्ग पोलिसांना पडला आहे शिवाय व्यापारी व संशयीत एकमेकांना ओळखत तर नाही ना? या दृष्टीनेही तपास सुरू आहे. रक्कम दुप्पट करण्याच्या उद्देशाने ही आरोपींनी व्यापार्‍याला गंडवले तर नसावे ना? अशीदेखील दबक्या आवाजात चर्चा असून सर्व बाबींचा बारकाईने तपास करून सत्य समोर आणण्याचे लोहमार्ग पोलिसांपुढे आव्हान आहे. पासी यांचा फॉरेस्ट विभागाने जप्त केलेली लाकडे विकत घेवून विकण्याचा व्यवसाय असल्याचे समजते.

भुसावळात ‘खाकी‘ला लागला डाग
बाजारपेठ पोलिसांनी निरपराध व्यक्तीला फाईट मारून जखमी केल्याची घटना ताजी असतानाच लोहमार्गच्या पोलिसात दरोड्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याने खाकीची भुसावळात पुरता बदनामी झाली आहे. लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत गँगरेप, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत तर दुसरीकडे चोर्‍यांचे प्रमाण वाढले असताना यंत्रणा मात्र ढीम्म असल्याने सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.