लोहारखेड्यात एकाला बेदम मारहाण : तिघांविरोधात गुन्हा

मुक्ताईनगर : जुन्या भांडणाच्या कारणावरून 41 वर्षीय व्यक्तीला तिघांनी बेदम मारहाण करीत गंभीर दुखापत केली. ही घटना तालुक्यातील लोहारखेडा येथे घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या भांडणातून केली मारहाण
गणेश राजाराम पाटील (41, रा.लोहारखेडा, ता.मुक्ताईनगर) हे स्वयंपाकीचे काम करून उदरनिर्वाह करतात. शनिवार, 19 फेब्रुवारी रोजी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास लोहारखेडा गावातील शिव मंदिराजवळ संशयीत आरोपी हरी पांडुरंग कोळी यांनी मागील भांडणाच्या कारणावरून हातातील विटेने मारहाण केली तर सोबत असलेल्या योगेश पांडुरंग कोळी व वैभव योगेश कोळी (सर्व रा.लोहारखेडा) यांनीदेखील हातातील आसारी घेऊन पायांवर मारहाण केली. या मारहाणीत गणेश पाटील हे गंभीर जखमी झाले. उपचारानंतर शुक्रवार, 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने संशयीत आरोपी हरी पांडुरंग कोळी, योगेश पांडुरंग कोळी, वैभव योगेश कोळी (सर्व रा.लोहारखेडा, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक उमेश महाजन करीत आहे.