लोहारा । येथील उपसरपंच अक्षय जैसवाल यांच्या विरोधात 11 विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी 25 मे रोजी पोचारा तहसीलदारांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी व मतदान घेण्यासाठी 31 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून त्याबाबत सर्व ग्रामपंचायत सदस्यांना हजर रहाण्याबाबत लोहार्याच्या तलाठ्यांनी नोटीस बजावलेल्या आहेत. हा अविश्वास प्रस्ताव ज्या करणासाठी दाखल करण्यात आला त्यात पंचायतीचा कारभार करतांना सदस्याना विश्वासात न घेणे,स्वतःच्या मनमानी पद्धतीने पंचायतीचा कारभार करणे, ग्रामविकासाकडे हेतुपुरर्सर दुर्लक्ष करून प्रभागातील कामांमध्ये व सदस्यांमध्ये भेदभाव करणे आशा प्रकारचे कारणे देण्यात आली आहेत .
जैस्वाल यांचे पंधरा वर्षांपासून वर्चस्व
अविश्वास प्रस्तावावर कैलास चौधरी, देवराम काळे, मन्नान खान याकूब खान, प्रकाश कोळी ,राजु भदाणे , गंगाराम भील , योगीता क्षीरसागर , सिमा तायडे , मालतीबाई पाटील, आनंदीबाई माळी, मरियम बी हसन शेख या अकरा ग्रामपंचायत सदस्यानी सह्या केलेल्या आहेत. येथील ग्रामपंचायत ही सतरा सदस्यीय असून त्यातील विठ्ठल क्षीरसागर या विद्यमान ग्रामपंचायत सदस्याचे नुकतेच निधन झालेले असल्याने आता सोळा सदस्यामध्येच अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. अक्षय जैस्वाल यांचे येथील ग्रामपंचायतीवर गेल्या पंधरा वर्षांपासुन निर्विवाद वर्चस्व राहिलेले आहे हे विशेष . त्यामुळे या अविश्वास प्रस्तावाचे 31 मे रोजी नेमके काय होते. याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे