जळगाव । पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व अधिकाधिक शेती सिंचनाखाली आणण्यासाठी शासनातर्फे जलयुक्त शिवार अभियान हे उपक्रम राबविण्यात येत आहे. हा शासनाचा फ्लँगशिप प्रोग्राम आहे. नाला खोलीकरण, बंधारा निमिर्तीसह अनेक कामे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत महाराष्ट्र भरात होत आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेल्या लोहारा या गावाला जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केलेल्या कामगिरीबद्दल जलयुक्त शिवार अभियानाचे दुसर्या क्रमांकाचे विभागीय बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे. ’मी मुख्यमंत्री बोलताय’ या कार्यक्रमात राज्यातील 22 शेतकर्यांनी सहभाग घेतला यापैकी 5 शेतकर्यांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याचे भाग्य लाभले. यात लोहारा येथील शेतकरी डॉ.बाळू जैन यांचा समावेश होता.
लोहारा येथे 2012-13 अगोदर मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भीक्ष जाणवत होते. पाण्याच्या गरजेतुन शेतकर्यानी एकत्र येत भविष्याच्या दृष्टीकोनातुन पाणी अडवणुक करण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन आमदार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शेतकर्यांना कोकलॅण्ड उपलब्ध करुन दिल्याने शेतकर्यांनी बंधारा बांधकाम, नालाखोलीकरणाचे काम केले. या कामगिरीची मुख्यमंत्र्यांनी 2015-16 मध्ये पाहणी केली. लोहारा येथे करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे परिसरातील पाणी टंचाई दुर झाली असून टँकरद्वारे करण्यात येत असलेला पाणी पुरवठा पुर्णतः बंद झाला आहे. 38 बंधारे, 2 केटी वेअरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलसाठा करण्यात आलेला आहे.
पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवायला लागल्याने पाण्याच्या गरजेतुन शेतकर्यांनी एकत्र येत पाणी टंचाईवर मात करण्याचा निर्णय घेतला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातुन यंत्र साहित्यासह निधी उपलब्ध झाल्याने पाणी टंचाईवर मात करता आले. शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आल्याने समाधान वाटते.
– डॉ. बाळू जैन (शेतकरी), लोहारा