परभणी- देशाचे राष्ट्रगीत असताना ‘वंदे मातरम्’ची सक्ती कशासाठी असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रगीत म्हणणारे सर्वच जण भारतीय आहेत. त्यामुळे मित्रपक्ष ‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध आहे असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले. आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे नवीन वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रकाश आंबेडकर आज मातंग समाज सत्ता संपादन परिषदेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणीमध्ये होते.
सर्व मोठ्या पक्षांचा निषेध
बहुजन वंचित आघाडीला सर्वच समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे हे आंबेडकर यांनी सांगितले. आम्ही लोकसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याचे सांगतच ओबीसी समाजातील लहान घटकांतूनच सर्वाधिक उमेदवार दिले जाणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले. बहुजन वंचित आघाडीने असदुद्दीन ओवेसींच्या ‘एमआयएम’शी मैत्री केल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप या चारही मोठया पक्षांनी अतिशय हिनपणे जातीचा उल्लेख केला. या सर्व मोठ्या पक्षांच्या असल्या हिडीस प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. ज्यावेळी जाती आणि धर्माच्या राजकारणाला आव्हान दिले जाते त्यावेळी द्वेषाचे राजकारण होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या चारही मोठ्या पक्षांची मानसिकता वर्चस्ववादी असल्याचे आरोप आंबेडकरांनी केला.