पुणे : वकील देवानंद ढोकणे यांच्यावर व्यावसायिक वादातून गोळीबार करण्यात आले होते. आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज दुपारी आरोपींच्या अंगावर वकिलांचा जमाव धावून गेला. न्यायालयाच्या परिसरात हा प्रकार घडला. त्यानंतर न्यायालय परिसरात वकिलांनी जोरदार घोषणाबाजी करीत वकील एकजुटीचा नारा दिला.
वकिलांनी अचानक घेतलेल्या या पावित्र्यामुळे पोलिसांचीही काहीकाळ भंबेरी उडाली होती. मात्र, त्यांनी आरोपीला सुरक्षितपणे वाहनापर्यंत नेले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीचे हक्क अबाधीत ठेऊन २ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने वकिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी आरोपीची ओळख परेड व्हायची असल्याने पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवला. यानंतर पोलीस आरोपीसह बाहेर आल्यावर काही वकिल त्याच्या अंगावर धावून गेले. मात्र, पोलिसांनी तातडीने आरोपीला गाडीत घालून नेले.
संगमब्रीज येथे सोमवारी रात्री पावणेनऊ वाजण्याचे सुमारास कारमधून भाऊ बाळासाहेब ढोकणे यांचा सोबत घरी जात असलेले अॅड.देवानंद रत्नाकर ढोकणे (वय-४२, रा.येरवडा,पुणे) यांच्यावर दोघांनी गोळीबार करत प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने कुरमादास काळूराम बढे (वय-३२, रा.कलूस,ता.खेड) यास अटक केली.तर त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले आहे. बढे हा अॅड.ढोकणे यांचा पक्षकार असून त्याने एका खटल्याकरिता दिलेले दोन लाख रुपये अॅड.ढोकणे यांनी परत न केल्याने त्याने रागाच्या भरात गोळीबार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.