वडगाव मावळ : येथील मोरया मित्र मंडळ यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. मोरया मित्र मंडळाचे अध्यक्ष मयूर ढोरे आहेत. मंडळातर्फे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त वडगाव मावळ व परिसरातील गणेशभक्तांसाठी शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
मोरया मंडळाने पहिल्या दिवशी भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित केला. त्यानंतर दुस-या दिवशी सकाळच्या सत्रात आरोग्य शिबीरासाठी नागरिकांनी गर्दी केली तर सायंकाळच्या सत्रात महिला वर्गाने मंगळागौरीचा फेर धरला. तिस-या दिवशी इको फ्रेंडली गणपती बनविणे, निबंध चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चौथ्या दिवशी खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमासाठी महिला वर्गाने विशेष गर्दी केली. पाचव्या दिवशी बालजत्रा व चालता बोलता कार्यक्रम झाला.
यावर्षी मंडळाकडून गणेशोत्सवादरम्यान प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवशी गिरीश जाधव यांच्या सौजन्याने शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरु होते. प्रदर्शनात प्रत्येक शास्त्राविषयी माहिती देखील दर्शकांना देण्यात आली. माहितीसह शास्त्रास्त्र पाहण्याची अनोखी संधी वडगाव मावळ व परिसरातील नागरिकांना मिळाली. सायंकाळी सहा वाजता शिवचरित्र्यातून आता काय शिकावे या विषयावर यशवंत गोसावी यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
मंडळाकडून गणेशोत्सवादरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि गणपती बनविणे स्पर्धांचा समावेश होता. मोरया मित्र मंडळाने गणेशोत्सवात सर्व वयोगटातील गणेशभक्तांना सहभागी होता येईल अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यामध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी हिरीरीने सहभाग घेतला.