मुंबई । अंधेरीत राहणार्या जगदीश पटेल (50) यांचे काविळमुळे यकृत पूर्णपणे निकामी झाले होते. पटेल यांना लिव्हर सिरॉसिस हा आजार होता. डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे पटेल कुटुंबीयांना सांगितले. यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नाही असे सांगितल्यानंतर, नेहाने वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी पुढाकार घेत यकृत दान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मुलीने यकृताचा 60 टक्के दान केलेला भाग वडिलांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आला. पटेल यांचे प्राण वाचविण्याचा अखेरचा मार्ग हा यकृतदान हाच होता. त्यामुळे यकृतदानाच्या प्रतीक्षा यादीवर नाव नोंदवले नाही. कारण अधिक वेळ लावला असता तर पटेलांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. त्यामुळे पटेलांचे प्राण वाचवण्यासाठी नेहाने यकृत दान करण्याचा निर्णय घेतला.
रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख व यकृततज्ज्ञ सर्जन डॉ. रवी मोहंका म्हणाले की, यकृताचे प्रत्यारोपण ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते. या प्रत्यारोपणासाठी मुलीच्या यकृताचा 60 टक्के भाग घेण्यात आला. त्या भागाचे त्यांच्या वडिलांमध्ये यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले आहे. आता रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. जिवंतपणी यकृताचा काही भाग दान करता येतो, दान केलेल्या व प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींच्या शरीरात यकृताची वाढ होते, सहा ते आठ आठवड्यांत हे यकृत पुन्हा पूर्ण विकसित होते, असेही ते म्हणाले.
प्रत्यारोपण खर्च 25 लाख
ग्लोबल रुग्णालयात 31 ऑगस्टला ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. 60 टक्के यकृत वडिलांना दान केल्याने त्यांचे प्राण वाचवता आले. नेहा यांना आठवड्याभरात डिस्चार्ज देण्यात आला. पण वडिलांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. यावर नेहा म्हणाल्या की, यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी 25 लाखांचा खर्च सांगण्यात आला होता. त्यानुसार आतापर्यंत 24 लाख रुपये भरण्यात आले आहे. नातेवाइकांनी व मित्रांनी पैशांची जुळवा-जुळव करण्यात खूप मदत केली. त्यानुसार प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रीयेचा खर्च भागविण्यात आला.