वढुतील मुलांनी रॅलीतून दिला शांततेचा संदेश

0

शिक्रापूर । कोरेगाव भिमा येथे उसळलेया दंगलीला एक महिना पूर्ण झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यासाठी वढू बुद्रुक येथे माहेर संस्थेच्या वतीने मेणबत्ती रॅली काढण्यात आली होती. माहेर संस्था ते वढू बुद्रुक चौकापर्यंत मानवी साखळी तयार करून नागरिकांना शांततेचा संदेश देण्यात आला. समाजात शांतता, एकी, प्रेम, जातीय सलोखा वाढावा या उद्देशाने या शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन, अध्यक्ष हिराबेगम मुल्ला यांनी सहभाग घेतला होता. सदर रॅली व शांततेसाठी माहेर संस्थेच्या 400 मुलांसह संपूर्ण कर्मचारी वर्गाने एक दिवसाचा उपवास केला. यांनतर काढण्यात आलेल्या शांतता रॅलीमध्ये सर्व मुले-मुलीं हातामध्ये मेणबत्ती घेऊन यामध्ये सहभागी झाल्या होत्या.

मुलांनी केला उपवास
ही रॅली यशस्वी होण्यासाठी माहेर संस्थेचे वैभव पवार, रमेश दुतोंडे, संदीप म्हेत्रे, हरीश अवचर, अतुल शेळके, आनंद सागर, अनिता दुतोंडे, मिनी एम. जे, अतेना नायर यांसह आदींनी विशेष परिश्रम घेतले. तर मुलांनी एक दिवसाचा उपवास करून गोळा केलेली रक्कम गरजू महिलेला देण्यात येणार असल्याचे यावेळी माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन यांनी सांगितले. तर नागरिकांनी समाजामध्ये एकोप्याने राहून आपण सर्व एक आहोत या हेतूने एकमेकांच्या सुख दु:खामध्ये सामील होऊन सर्वधर्म समभाव या हेतूने रहाणे गरजेचे असल्याचे हिराबेगम मुल्ला यांनी सांगितले.