जळगाव । डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटच्या बाजुला असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल (लेवा भवन) सभागृहात सोमवारी नाभिक समाजाचा वधू-वर परिचय मेळावा होता. या गर्दीचा फायदा घेत एक पाकीट मारत असल्याचे मेळाव्यातील काहीजणांनी बघितले. त्यानंतर चोरटा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला नागरीकांनी पकडून चांगलाच चोप दिला. यानंतर त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, मेळाव्यात एका महिलेचे 3 हजार रुपये चोरले गेल्याचे समोर आले आहे.
साथीदार घटनास्थळावरून पसार
लेवा भवनात सोमवारी नाभिक समाजाचा वधू-वर परिचय मेळावा होता. मेळवा उत्तर महाराष्ट्र स्तरीय असल्याने पाच जिल्ह्यातील नाभिक समाजबांधव एकत्र आलेले होते. त्यामुळे लेवा भवनात सोमवारी सकाळपासूनच गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊन पाकीट मारण्यासाठी चार ते पाच चोरट्यांची टोळी सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सभागृहात घुसली. दुपारी 12 वाजेच्या सुमारास मेळाव्यात आलेल्या एका नागरीकाच्या खिशातून पाकीट मारत असल्याचे काही जणांनी बघितले. त्यानंतर त्या चोरट्याला हटकल्यानंतर तो सभागृहाच्या बाहेर पळून जात असताना त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यावेळी त्याने चोरी करण्यासाठी नाही, तर जेवण करण्यासाठी आल्याचा बहाणा केला. त्यानंतर चोरट्याला जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे छगन तायडे यांच्या ताब्यात दिले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव शेेख शहजाद शेख अजगर (वय 18, रा. भुसावळ) असे सांगितले. पोलिसांच्या चौकशी दरम्यान त्याने चोरी करण्यासाठीच आला असल्याचे सांगितले. मात्र चोरी केली नसल्याचे त्याने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले. त्याच्या सोबत आणखीन तीन, चार साथीदार होते.
महिलेचे 3 हजार लांबविले या गडबडीत एका महिलेचे 3 हजार रुपये लांबविल्याचे समोर आले. मात्र शेख शहजादच्या खिशात फक्त 350 रुपये होते. त्यामुळे महिलेच्या पर्समधून त्याच्या इतर साथीदारांपैकी कोणीतरी चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे. शेख शहजादवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. नाभिक समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात चोरी करताना सापडलेला शहजाद शेख हा मुळचा भुसावळ येथील आहे. मात्र काही महिन्यांपुर्वी त्याने शिवाजीनगर परिसरात एक खोली भाड्याने घेऊन तो पत्नी सोबत राहत होता. मात्र पोलिसांच्या नजरेत आल्याने काही दिवसांपुर्वीच त्याने जळगाव शहर सोडून पुन्हा भुसावळ येथे राहण्यासाठी गेल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. तो सराईत गुन्हेगार आहे.