वनक्षेत्र व वृक्षाच्‍छादन वाढविण्‍यासाठी ‘कन्‍या वन समृध्‍दी’ योजना

0

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने राज्‍य मंत्रीमंडळाचा महत्‍वपूर्ण निर्णय
मुंबई-ज्‍या शेतकरी कुटूंबामध्‍ये मुलगी जन्‍माला येईल अशा शेतकरी दाम्‍प्‍त्‍याने मुलीच्‍या नावे शासनाच्‍या मदतीने 10 वृक्षांची लागवड करण्‍याचा उद्देशाने ‘कन्‍या वन समृध्‍दी योजना’ सुरू करण्‍याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला आहे. अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला आहे.

वैश्विक तापमान वाढीचे संकट, त्‍यामुळे निसर्गामध्‍ये झालेले मोठे फेरबदल, नैसर्गीक आपत्‍तींमध्‍ये झालेली वाढ, वाढते प्रदुषण इत्‍यादी कारणांमुळे पर्यावरणाचे संतुलन आणि जैवसृष्‍टीची स्थिरता यामध्‍ये सातत्‍याने बदल होत आहे. यावर प्रभावी उपाययोजना म्‍हणून राज्‍यात विविध माध्‍यमातुन वनक्षेत्र व वृक्षाच्‍छादन वाढविण्‍यासाठी वनविभागाचे सातत्‍याने प्रयत्‍न सुरू आहेत. महाराष्‍ट्राच्‍या ग्रामीण भागात स्‍वतःची जमीन असणा-या शेतक-यांसाठी ही योजना लाभकारक ठरणार आहे.

महाराष्‍ट्रामध्‍ये दरवर्षी जन्‍माला येणारे मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे. त्‍यापैकी राज्‍यातील शेतकरी कुटूंबात जन्‍माला येणा-या मुलींचे कुटूंब या योजनेचा लाभ घेण्‍यासाठी पुढे येतील असा अंदाज आहे. दरवर्षी किमान 2 लक्ष शेतकरी कुटूंबांना कन्‍या वन समृध्‍दी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्‍यापेक्षा जास्‍त अर्ज आल्‍यास त्‍यांचा सुध्‍दा विचार करणे शक्‍य आहे. वाढत्‍या लोकसंख्‍येचा विचार करता पर्यावरण संवर्धनाच्‍या दृष्‍टीने समाजातील सर्व घटकांचा कोणत्‍या न कोणत्‍या स्‍वरूपात सहभाग घेवून जास्‍तीत जास्‍त झाडे लावणे अनिवार्य आहे. या सर्व बाबींचा विचार करून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने कन्‍या वन समृध्‍दी योजना सुरू करण्‍याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

योजनेचे उद्देश

वनक्षेत्राव्‍यक्‍तीरिक्‍त जास्‍तीत जास्‍त क्षेत्र वनाखाली आणणे, ज्‍या कुटूंबामध्‍ये मुलगी जन्‍माला येईल अशा शेतकरी दाम्‍प्‍त्‍याला 10 रोपे विना‍मुल्‍य देवून प्रोत्‍साहीत करणे, त्‍यामध्‍ये 5 रोपे सागाची, 2 रोपे आंबा, 1 फणस, 1 जांभुळ आणि 1 चिंच इ. भौगौलिक परिस्‍थीतीनुसार अन्‍य प्रकारच्‍या फळांच्‍या रोपांचा समावेश असेल पर्यावरण, वृक्ष लागवड व संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता इत्‍यादी बाबत सध्‍याच्‍या आणि भावी पिढीमध्‍ये आवड व रूची निर्माण करणे, अशा योजनेमधुन मुलगा आणि मुलगी समान असुन महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देणे, तसेच मुलींच्‍या घटत्‍या संख्‍येवर अशा योजनांद्वारे काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे हे या योजनेचे उद्देश आहेत.

सदर योजनेच्‍या लाभाकरीता शेतकरी कुटूंबात जन्‍म झालेल्‍या मुलीच्‍या पालकांनी मुलीचा जन्‍म झाल्‍यानंतर संबंधित ग्राम पंचायतीच्‍या ठिकाणी मुलीच्‍या नावाची नोंद केल्‍यानंतर संबंधित ग्राम पंचायतीकडे विहीत नमुन्‍यात अर्ज केल्‍यास या योजनेचा लाभ घेता येणार आहे. राज्‍यात वृक्षाच्‍छादन वाढावे यादृष्‍टीने विविध उपाययोजना करत 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार करणारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या संकल्‍पनेतुन साकारलेली ही योजना वृक्ष लागवड मोहिमेच्‍या प्रवासातील मैलाचा दगड ठरणार आहे.