वनजमिनीवरील अतिक्रमणांवर हातोडा

0

नारायणगाव । वाणेवाडी, नगदवाडी कांदळी, हिवरेतर्फे नारायणगाव वनहद्दीत येणार्‍या नारायणगड परिसरात आदिवासी समाजातील लोकांनी केलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम वनविभाग, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या हाती घेतली. या कारवाईत 63 कुटुंबांच्या झोपड्या हटविण्यात आल्या. उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर, आंबेगाव आणि खेड येथील 150 हून अधिक वनसंरक्षकांनी ही कारवाई केली.

नारायणगड परिसरातील वनविभागाच्या जागेवर काही आदिवासी नागरिकांनी झोपड्या बांधून अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात वनविभागाने यासंदर्भात या समाजाच्या लोकांना वेळोवेळी जाहीर नोटिस देऊन सुचित केले होते. परंतु त्यांनी त्याला प्रतिसाद न दिल्याने जुन्नर येथील वनविभागाचे अधिकारी उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर, आंबेगाव आणि खेड येथील 150 हून अधिक वनसंरक्षकांनी धडक कार्यवाही केली. या मोहिमेत आदिवासी समाजाच्या एकूण 63 कुटुंबांच्या झोपड्या पाडण्यात आल्या. यावेळी आदिवासी समाजाची लोक त्याठिकाणी उपस्थित नव्हती. या कार्यवाही दरम्यान जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे, जुन्नरचे पोलीस उपाधीक्षक राम पठारे, नारायणगाव सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड उपस्थित होते.

गुन्हे दाखल करण्याची तंबी
आदिवासी समाजातील लोकांना अतिक्रमण करा, असा सल्ला दिला जातो. तुम्ही वर्षानुवर्षे त्याठिकाणी राहिलात तर तुम्हाला ती जमीन मिळेल, अशी चुकीची माहिती पुरविली जाते. यामुळे हा समाज वारंवार अतिक्रमण करतो, असे जुन्नरचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांनी सांगितले.